मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवं वळण मिळालं आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप सुरू असून, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही याचा तपास सुरू केला. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप आता बिहार पोलिसांकडून केला जात आहे.

आणखी वाचा- सुशांतच्या बँक खात्यातून ५० कोटी रुपये काढले गेले, याबाबत मुंबई पोलीस गप्प का?- बिहारचे पोलीस महासंचालक

दोन्ही पोलीस यंत्रणाकडून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. “पोलीस महासंचालक सुशांतसिंहच्या वडिलांशी सकाळी बोलले. त्यांनी सीबीआय चौकशी करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस आम्ही करत आहोत,” असं नितीश कुमार म्हणाले.

आणखी वाचा- “… त्यामुळे यात काहीतरी चुकीचं वाटतंय”; बिहारच्या पोलीस महासंचालकांचा मुंबई पोलिसांवर आरोप

आणखी वाचा- “सुशांतच्या जिवाला धोका आहे हे फेब्रुवारीतच पोलिसांना सांगितलं होतं”

सुशांतसिंहने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्या आत्महत्येचा कारणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत असून, काही दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी देखील होत आहे. मात्र, राज्य सरकारनं त्याला नकार दिलेला आहे. मात्र, बिहार सरकारनं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.