राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना १३ एकर जागा बाहेरच्या व्यक्तीकडून भेट देण्यात आल्याचा आणखी एक आरोप भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी केला आहे.

सुशील मोदींच्या म्हणण्यानुसार, बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालू पुत्र तेज प्रताप यादव यांना सन १९९२ मध्ये १३ एकर पेक्षा जास्त जमीन भेट देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय ३ वर्षे होते. तर लालू प्रसाद यादव हे बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री होते. शेओहार येथिल सध्याच्या भाजपच्या खासदार आणि राजदचे माजी मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांच्या पत्नी रमा देवी यांच्याकडून एका कराराद्वारे एकूण १३.१२ एकर जागा तेज प्रताप यादव यांच्या नावे भेट देण्यात आली होती. हा करार उर्दू भाषेत करण्यात आला होता.

या जमीनीबाबत मंगळवारी रमा देवी यांनी देखील भाष्य केले असून, आपण ही जागा तेज प्रताप यादव यांना माझ्या पतीच्या सूचनेनुसार दिली होती. आम्ही यापूर्वी या जागेचा वापर केलेला नाही. लालू प्रसाद यादव त्याकाळी मुख्यमंत्री असल्याने ते ही जागा विकसीत करतील यासाठी ही जागा देण्यात आली होती. त्यामुळे माझे पती जागा देताना खूश होते, असे रमा देवी यांनी म्हटले होते. तत्कालीन राजदचे मंत्री असलेल्या देवी यांच्या पतीची १९९८ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्या राजदच्या तिकीटावर त्यांच्या पतीच्या जागेवर उभ्या राहिल्या आणि निवडून येऊन पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली.

सुशील मोदी म्हणाले, भेट देण्यात आलेली जमीन आता लालू प्रसाद यादव बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. रमा देवी यांनी त्यावेळी आपल्या पतीला मंत्रीपद मिळावे यासाठी ही जमीन भेट दिल्याचा आरोपही मोदी यांनी केला आहे. मात्र, या आरोपांचे खंडन करताना राजदचे प्रवक्ते शक्ती सिंह म्हणाले, या प्रकरणी सर्वकाही जगजाहीर आहे. तसेच जर भेट देणाऱ्याला काही अडचण नाही तर सुशील मोदी का उगाचच आरडाओरडा करीत आहेत.
बाहेरच्या व्यक्तींनी आपल्या राजकीय फायद्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना जमीनी दिल्याचा आरोप यावेळी पाचव्यांदा करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री रघुनाथ झा, कांती सिंह, ललन चौधरी आणि ह्रदयानंद चौधरी यांनीही लालुंच्या कुटुंबियांना अशा जमीनी दिल्याचा आरोप आहे.