येत्या तीन दिवसांत लालूप्रसाद यादव यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणेन, लालूप्रसाद यादव यांचे संबंध कोणत्या माफियाशी आहेत, जमीन प्रकरणात काय भ्रष्टाचार झाला आहे ते सारं काही समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असं बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे. जमीन घोटाळा आणि माती घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादवही अडचणीत येऊ शकतो.

मागील ४८ तासांत आम्ही लालूप्रसाद आणि त्यांच्या मुलांनी केलेल्या घोटाळ्या संबंधी १०० जणांची चौकशी केली आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई यापुढेही सुरूच राहणार आहे. बिहारचा विकास आणि भ्रष्टाचाराविरोधात लढाई ही आमची प्राथमिकता आहे. या सरकारची स्थापना करण्यामागे भ्रष्टाचार आणि घोटाळे रोखणं हाही एक उद्देश आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा बाळगणाऱ्यांची खैर नाही असा इशाराही मोदी यांनी दिला आहे.

आम्ही कोणाचाही बदला घ्यायचा म्हणून ही प्रकरणं बाहेर काढत नाही तर आम्हाला आमच्या कारभरात पारदर्शकता आणायची आहे. वनविभागाशी संबंधित माती घोटाळाही समोर आला आहे त्यासंदर्भातली कागदपत्रं आम्ही मागवली आहेत. सुशीलकुमार मोदी यांच्या भूमिकेमुळे आता लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार आहेत यात शंकाच नाही.

बिहारमध्ये गेल्या आठवड्यात जदयू आणि राजदची युती तुटली.मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपसोबत हातमिळवणी केली. तसंच राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आत भाजपच्या साथीनं पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राजद आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्काच होता. आता बिहारमध्ये भाजप आणि जदयूचं राज्य आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री तर सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रीपदी आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर आता सुशीलकुमार मोदी यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरूवात केली आहे. यामुळे आधीच सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांचा पाय आणखी खोलात रूतण्याची शक्यता आहे.