परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आसियान देशांतील व्हिएतनामच्या दौऱ्यासाठी आल्या असून त्यांनी येथे जयपूर फूट शिबिराचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी भारताने मोफत उपलब्ध केलेल्या कृत्रिम अवयवांच्या पाचशे लाभार्थीची भेट घेतली.

स्वराज या कंबोडिया व व्हिएतनाम दौऱ्यात आसियान देशांशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्न करणार आहेत. कृत्रिम पायांच्या मदतीने चालणाऱ्या मुलीची भेट  घेऊन स्वराज यांनी तिला प्रोत्साहन दिले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, जयपूर फूट शिबिराचे उद्घाटन श्रीमती स्वराज यांनी केले असून व्हिएतनाममधील फू थो प्रांतात त्याचे आयोजन करण्यात आले होते.

व्हिएतनाममधील भारतीय समुदायाने पार पाडलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध व लोक पातळीवरील संपर्क बळकट करण्यात  तेथील भारतीय लोकांचा मोठा वाटा आहे असे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात जयपूर येथे असे जाहीर करण्यात आले होते की, म्यानमार व व्हिएतनाममधील १००० दिव्यांगांना जयपूर फूटच्या वतीने कृत्रिम अवयव देण्यात येतील. जयपूर येथील भगवान महावीर विकलांग साहायता समितीने कृत्रिम अवय केंद्र सुरू केले होते. त्यांनी म्यानमारमध्येही असे शिबिर यांगूनमध्ये घेतले होते.

गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

स्वराज यांनी येथील भारतीय दूतावासात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राष्ट्रपित्यास आमची श्रद्धांजली असे सुषमा स्वराज यांनी यावेळी ट्विटरवर म्हटले आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान डाइ क्वांग यांनी मार्चमध्ये भारताला भेट दिली असता त्यावेळी राजघाटावर जाऊन त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली होती.