डोळ्याचा कॅन्सर झालेल्या पाकिस्तानातील एका पाच वर्षीय चिमुकलीला भारतात उपचार घेता यावेत, यासाठी तिला तातडीचा वैद्यकीय व्हिसा देण्यात यावा, असे आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी या मुलीच्या पालकांनी स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली होती.

अनामता फारुख (वय ५) असे कॅन्सरग्रस्त चिमुकलीचे नाव आहे. तिला भारतातील रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत. मात्र, तिला तातडीचे उपचार मिळावेत यासाठी व्हिसाची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे या चिमुकलीच्या पालकांनी स्वराज यांच्याकडे धाव घेतली आणि तातडीचा वैद्यकीय व्हिसा मिळावा, यासाठी विनंती केली होती. त्यानंतर स्वराज यांनी सोमवारी ट्विटरवरुन उच्चायुक्तांना तात्काळ व्हिसा देण्याचे आदेश दिले.

या मुलीबरोबरच आणखी एका पाकिस्तानी मुलाला बोनमॅरो रोपण शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय व्हिसा देण्यात आल्याचे स्वराज यांनी सांगितले. ‘तुमचा मुलगा लवकर बरा होवो’ अशा शुभेच्छाही त्यांनी या मुलाच्या वडिलांना दिल्या.

त्याचबरोबर इतर दोन पाकिस्तानी व्यक्तींना यकृत रोपणासाठी वैद्यकीय व्हिसा देण्यात येत असल्याचे स्वराज यांनी जाहीर केले. यातील एका व्यक्तीच्या मुलाने स्वराज यांच्याकडे वडिलांना वैद्यकीय व्हिसा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत स्वराज यांनी व्हिसा मंजूर झाल्याचे सांगत ट्विटरवरुन सांगितले होते.

सुषमा स्वराज यांनी वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांप्रती सहानुभूतीची भूमिका घेतली आहे. सीमेपलीकडून वारंवार जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असतानाही मानवतेच्या दृष्टीने स्वराज यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.