केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भाजपाच्या अतिशय सक्रीय नेत्या म्हणून ओळख आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सांभाळत असतानाच त्या सोशल मीडियावरही चांगल्याच अॅक्टीव्ह असतात. त्यांना कोणीही ट्विट केले की त्याला त्वरीत प्रतिसाद देत त्या आपल्याला शक्य तितकी मदत करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना असाच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधलेल्या एका भारतीय मुलीची त्यांनी पाकिस्तानमधून सुखरुप सुटका केली होती. ही बातमी माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात गाजली होती. मात्र सोशल मीडिया कधीकधी त्रासदायकही ठरु शकतो. सत्तेत असल्याने कधी विरोधक तर कधी स्वत:च्याच पक्षातील लोक आपल्यावर टिका करत असल्याने त्यांनी अशा लोकांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन थेट ब्लॉक करण्याचा पर्याय स्विकारला आहे.

ट्विटर वापरत असताना कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक करु शकता. याच फिचरचा वापर करत सुषमा स्वराज यांनी काही जणांना ब्ल़ॉक केल्याचे समोर आले आहे. सुषमा स्वराज यांचे आत ट्विटरवर १ कोटी १० लाख फॉलोअर आहेत. अनेक सामान्य नागरीक त्यांच्या विविध तक्रारींसाठी थेट स्वराज यांच्याशी ट्विटरव्दारे संपर्क करतात. यामध्ये कधी पासपोर्ट हरविला आहे, अचानक विमानाने प्रवास करावा लागत आहे. सुटीच्या दिवशी दूतावासाशी संपर्क करायचा आहे अशा अनेक अडचणी असतात. विशेष म्हणजे सुषमा स्वराज अतिशय आपुलकीने या सगळ्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा आपल्यापरिने प्रयत्न करत असतात. त्यांच्या या मदत करण्याच्या स्वभावामुळेच त्यांना ‘मेडिकल माता’ आणि ‘व्हीसा माता’ असे म्हणूनही अनेकांनी चिडवले. विशेष सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केलेल्या अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीही फॉलो करतात.

परंतु सगळेच केवळ मदतीसाठी त्यांना ट्विट करतात असे नाही. तर अनेक जण त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टिकाही करतात. त्यातील अनेकांना त्या उत्तरे देतातही, मात्र अशा काही टिकाकारांना त्यांनी ब्लॉक करण्याचे सत्र सध्या सुरु झाले आहे. आपण सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टींसाठी निश्चित वापर करायला हवा. पण स्वराज यांना या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने ट्रोल केले जात असेल तर अशा नागरिकांना आणि नेत्यांनाही ब्लॉक करणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर उरतो. नुकतेच त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावरुन एका महिलेने त्यांना चुकीच्या पद्धतीने मेसेज केल्यामुळे या महिलेला ब्लॉक केले. आणि आपल्याला ब्लॉक करण्यात आले आहे असा मेसेज या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिला आहे. मात्र अशाप्रकारे एका मंत्र्याने नागरिकांना ब्लॉक करण्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावर टिकाही होत आहे.