कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी संसदेत मांडण्यात आलेला मसुदा तयार करण्यासाठी आपण काँग्रेस नेते शशी थरूर यांची मदत घेतल्याचे वृत्त सुषमा स्वराज यांनी फेटाळून लावले आहे. इतरांची मदत घ्यायला अजूनतरी माझ्या मंत्रालयात बौद्धिक दुष्काळ पडलेला नाही. मला अत्यंत उत्तम सहकाऱ्यांची साथ आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले. मी थरूर यांची मदत घेतल्याचे वृत्त कुणीतरी खोडसाळपणे पसरवल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलभूषण जाधवप्रकरणावर मंगळवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिले. यामध्ये कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी अनेक पर्याय मांडण्यात आले होते. मात्र, हा मसुदा तयार करताना स्वराज यांनी शशी थरूर यांची मदत घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते. या वृत्तानुसार शशी थरूर यांनी स्वराज यांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जून खरगे यांची परवानगी घेतली होती. मात्र, सुषमा स्वराज यांनी या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शशी थरूर यांच्यात असलेले वैयक्तिक संबंध यापूर्वीही लपून राहिलेले नाहीत. मोदींनी यापूर्वीही अनेकदा थरूर यांना मदतीसाठी पाचारण केले आहे. गेल्यावर्षी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड रहमान लखवीच्या पाकिस्नाकडून करण्यात आलेल्या सुटकेच्या निषेधार्थ भारताकडून तयार करण्यात आलेला निवेदनाचा मसुदाही मोदींनी थरूर यांच्याकडून तयार करवून घेतला होता. शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी निवड केलेल्या दहा ब्रँड अॅम्बेसिडरमध्ये शशी थरूर यांचा समावेश होता.

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मंगळवारी संसदेतही कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कुलभूषण जाधव हे भारताचे सुपूत्र असून त्यांना फाशी दिल्यास पाकिस्तानने परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे असा इशाराच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला होता. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या दिशेने पाकिस्तानने पाऊल टाकले तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. दोन्ही देशांमधील संबंधावर याचे परिणाम होतील असे स्वराज यांनी ठणकावून सांगितले होते.