परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे स्पष्टीकरण

भारत आणि चीन यांच्यातील ‘डोकलाम’चा वाद ‘राजनैतिक परिपक्वते’ने मिटवण्यात आला असून देशाचे एक इंचदेखील जमीन गमावलेली नाही. जैसे थे परिस्थिती कायम राखली गेली आहे, असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहान येथे अनौपचारिक बैठक का घेण्यात आली, या बैठकीत अजेंडा का ठरवण्यात आला नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता बोस यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, दोन्ही देशांत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे याच उद्देशाने ही बैठक आयोजित केली होती. बैठक कोणत्याही एका विषयापुरती सीमित न ठेवता महत्त्वाच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे बैठकीचा अजेंडा ठरवण्यात आला नाही. मात्र ‘डोकलाम’चा वाद सामंजस्याने सोडवण्यात आला आहे. दोन्हीकडील लष्कराला संयम बाळगण्याचा संदेश देण्यात आला आहे.मोदी आणि जिनपिंग यांच्यात एप्रिलमध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. आता चीनचे संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही देशांमध्ये लष्करी समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वर्षांअखेरीस परराष्ट्रमंत्री देखील भारतात येणार असून ते विविध लोकांशी गाठीभेठी घेणार आहेत. त्यातून चीन आणि भारत यांच्यात मतांचे आदानप्रदान होऊ  शकेल.

‘मी सक्षम’

बोस म्हणाले की, वुहानसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी देणे अपेक्षित होते. प्रश्न त्यांच्यासाठी आहेत मात्र ते परराष्ट्रमंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले. वुहानच्या बैठकीला परराष्ट्रमंत्री उपस्थित नव्हत्या, पण त्यांनीच उत्तरे द्यावीत. त्यावर सुषमा म्हणाल्या, ‘वुहान बैठकीला मी उपस्थित नव्हते, पण तिथे काय झाले याची सर्व माहिती माझ्याकडे आहे.  या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास मी सक्षम आहे.’