आज इंटरनेटमुळे जग अधिक जवळ आले आहे. अनेक कामे आज इंटरनेटमुळ घर बसल्या करता येतात. फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांतून आपल्या अडचणी थेट सरकारपर्यंत पोहचवण्याचे अनेक पर्याय आता उपलब्ध झाले आहेत. अशातच अनेक असे नेते आहेत जे या माध्यमांद्वारे सामान्यांचे प्रश्न सोडवताना दिसतात. याच स्मार्ट नेत्यांच्या यादीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. परदेशात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणींचा समाना करावा लागत असलेल्या अनेक भारतीयांना सुषमा स्वराज यांनी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून मदत केली आहे. आजही स्वराज यांनी एका तरुण भारतीय मुलीच्या ‘बिचाऱ्या सासरच्यांना’ मदत केली आहे. सध्या स्वराज यांनी दिलेले मजेशीर उत्तर सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीने ट्विट करुन माझ्या सासू-सासऱ्यांना व्हिसा मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. मात्र हे ट्विट तिने अगदीच मजेदार पद्धतीने लिहिले होते. आपल्या ट्विटमध्ये ही तरुणी म्हणते, ‘बिचारे (गरीब) माझे सासरवाडीवाले, म्हणजेच माझेच माझी सासू आणि सासरे यांना अनेकदा लग्न समारंभांना व्हिसा अडकून पडल्यामुळे येता आले नाही. तसेच यामुळेच अनेकदा आमचे लग्न पुढे ढकलावे लागले आहे. माझे लग्न त्यांच्या मुलाशी होणार असून तो त्यांचा एकूलता एक मुलगा आहे. त्यांना या लग्न समारंभात सहभागी व्हायचे आहे. प्लिज मदत करा.’ न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे लग्न भारतात असल्याचे समजते. त्यासाठी परदेशातून भारतात येणाऱ्या तिच्या सासू-सासऱ्यांबरोबरच तिचा स्वत:चा भारतीय व्हिसा व्हेरिफिकेशनमध्ये अडकून पडला आहे. व्हिसा न मिळाल्यास तिच्या सासू-सासऱ्यांबरोबरच तिला स्वत:च्याच लग्नाला येता येणार नाही. व्हेरिफिकेशन होऊन अद्याप त्यांना व्हिसा मिळालेले नसल्याने सासू-सासऱ्यांना स्वत:च्या मुलाच्या लग्नासाठी भारतात येता येणार की नाही याबद्दल अद्याप संभ्रम असल्याने या तरुणीने व्हिसाच्या मागणीसंदर्भात स्वराज यांना टॅग करुन हे ट्विट केले आहे.

या ट्विटला स्वराज यांनीही तितकेच मजेदार उत्तर दिले आहे. हे ट्विट कोट करत दिलेल्या उत्तरात स्वराज यांनी मी तुझ्या सासरच्यांना मदत करु शकते असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये स्वराज म्हणतात, ‘ओह… व्हीसा मिळवण्यासाठी मी तुझ्या सासरच्यांना मदत करु शकते. त्यामुळे त्यांना आता लग्न पुढे ढकलावे लागणार नाही.’

स्वराज यांच्या मजेशीर उत्तराची सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा सुरु आहे. स्वराज यांनी अशाप्रकारे ट्विट करुन एखाद्याला मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी फ्रीजसंदर्भात तक्रार करणाऱ्या एका व्यक्तीला दिलेले मजेशीर उत्तर चांगलेच चर्चेत आले होते.