देशाचे परराष्ट्र मंत्रालय अतिशय समर्थपणे सांभाळून गेल्या दोन वर्षांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचा कानमंत्र दिला आहे. त्यापैकी सुषमा स्वराज या समाजमाध्यमांवर सरकारमधील इतर मंत्र्यापेक्षा अधिक सक्रीय असतात. नेटिझन्सने केलेल्या ट्विटची दखल घेऊन सुषमा स्वराज यांनी गेल्या दोन वर्षांत परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित येणारे प्रश्न सोडविले आहेत. पण यावेळी सुषमा स्वराज यांना एका वेगळ्याच प्रश्नाला सामोरे जावे लागले. वेंकट नावाच्या एका ट्विटरकराने कोरिअन कंपनीकडून खरेदी केलेला फ्रीज खराब निघाल्याची तक्रार ट्विटच्या माध्यमातून थेट सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याजवळ केली. मग सुषमा स्वराज यांनीही या नेटिझनच्या प्रश्नावर त्रागा न करता याप्रकरणात आपण मदत करू शकत नसल्याची प्रांजळ कबुली दिली. त्या म्हणाल्या की, “फ्रीजच्या प्रकरणात मी तुमची मदत करू शकत नाही. मी संकटात सापडलेल्या लोकांची मदत करण्यात व्यग्र आहे.”
सुषमा स्वराज यांच्या या उत्तराला नेटिझन्स देखील रिट्विटच्या माध्यमातून पाठिंबा व्यक्त करत आहेत. सुषमा यांच्या उत्तराच्या ट्विटला तब्बल पाच हजार रिट्विट्स मिळाले आहेत.