आयपीएलचे एकेकाळचे सर्वेसर्वा ललित मोदी प्रकरणावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वराज यांचे पती कौशल यांनी आपण ललित मोदी यांचे गेल्या २२ वर्षांपासून वकील असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर २०१० च्या आयपीएलमध्ये मुंबईतील ‘फोर सीझन हॉटेल’मध्ये मोदी यांच्याकडून खास पाहूणचार झोडपल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कौशल हे ललित मोदी यांच्या आग्रहावरून कायदेशीर सल्लागार या नात्याने २१ व २२ एप्रिल, २०१० मध्ये ‘फोर सीझन हॉटेल’ राहिले होते. त्यांना समुद्र दिसणारी डिलक्स खोली देण्यात आली होती. मात्र याचे बिल मोदी यांच्या कार्यालयाकडून अदा न करता आयपीएलच्या खात्यातून देण्यात आले होते. याबाबत कौशल यांनी विचारणा केली असता त्यांना बीसीसीआय किंवा आयपीएलशी संबंधित काम असल्याने आयपीएल खर्च उचलणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर कौशल यांनी मोदींना ‘आपण क्रिकेटपासून नेहमी लांब राहिलो’, असे सांगितले होते.
हॉटेलचा कार्यालयासाठी वापर
कौशल हे आयपीएलच्या २०१० हंगामातील हॉटेलमध्ये राहिलेल्या पाहुण्यांपैकी एक होते. मोदी यांना आयपीएलच्या अध्यक्षपदावरून पदच्यूत व्हावे लागल्यानंतर बीसीसीआयने या पाहुण्यांची यादी तयार केली होती. मोदी गेल्यानंतर हॉटेलकडून बीसीसीआयला तब्बल १.५६ कोटी रुपयांचे देणे असल्याचे बिल आले होते. यानंतर खळबळ माजल्याने फोर सीझन हॉटेलकडून या खास पाहुण्यांची माहिती मागविण्यात आली होती.
या हॉटेलचा वापर मोदी यांनी आपले कार्यालय म्हणून केला होता. यामुळे हे बिल बीसीसीआयने भरण्याचे अमान्य करत ते मोदी यांनी भरावे, असा निर्णय बीसीसीआयच्या समितीने घेतला होता.