पाकिस्तानच्या सीमेवरच्या कुरापती संपताना दिसत नाहीत. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली दरी वाढते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एकीकडे शांती चर्चा सुरू करण्याची मागणी करताना दिसतात दुसरीकडे भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याचाच परिणाम संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतही बघायला मिळाला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी हे उपस्थित होते. मात्र या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत सुषमा स्वराज यांनी भाषण केलं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री उभे राहिले त्यांचं भाषण होण्यापूर्वीच सुषमा स्वराज तिथून निघून गेल्या ज्यामुळे महमुद कुरेशी यांचा तीळपापड झाल्याचे बघायला मिळाले.

मी सुषमा स्वराज यांचं भाषण ऐकलं. त्यांनी क्षेत्रीय सहभागाबाबत भाष्य केलं. जर एकमेकांचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही तर क्षेत्रीय सहभाग कसा काय शक्य आहे असा प्रश्न कुरेशी यांनी विचारला. सुषमा स्वराज यांची प्रकृती ठीक नव्हती का ते ठाऊक नाही मात्र मी त्यांचं सगळं भाषण ऐकूनही त्या माझ्या भाषणासाठी थांबल्या नाहीत असं म्हणत कुरेशी यांनी आपला राग व्यक्त केला.

काय म्हटल्या सुषमा स्वराज

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी गेलेल्या सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. दहशतवाद हे दक्षिण आशिया क्षेत्र आणि जगासमोरचे मोठे आव्हान आहे. कोणताही भेद-भाव न करता दहशतवाद नष्ट करावा लागेल. दहशतवादाला संरक्षण देण्याऱ्या शक्तीही नष्ट कराव्या लागतील असं म्हणत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे कान टोचले. भाषणात हे सगळे सुनावल्यावर आणि त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भाषणही न ऐकल्याने पाकिस्तानच्या मंत्र्यांचा चांगलाच तीळ पापड झाल्याचे दिसून आले.