भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.  त्या ६६ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे देहावसान झाले. मागील तीन दशकांपासून भाजपामधील महिला नेतृत्व म्हणून स्वराज यांच्याकडे पाहिले जायचे. स्वराज यांच्या वकृत्व, व्यक्तीमत्व आणि स्पष्ट वक्तेपणाची छाप त्यांच्या राजकारणामध्ये प्राकर्षाने जाणवली. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कतृत्वाचं नाणं खणखणीत वाजवलं. मात्र राजकारणात दिसणारी सुषमा यांच्यांतील धमक त्यांनी खासगी आयुष्यातही दाखवली होती. ज्या काळात महिलांना पुरेसे स्वातंत्र्य दिले जात नव्हते त्या काळात स्वराज यांनी आई-वडिलांचा विरोध असतानाही प्रेमविवाह केला होता.

सुषमा स्वराज यांनी १३ जुलै १९७५ रोजी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. मात्र कौशल यांच्याशी लग्न करण्यासाठी सुषमा आणि स्वराज यांना बऱ्याच जणांची समजुत घालावी लागली होती. स्वराज तसेच सुषमा यांच्या कुटुंबाचाही या विवाहाला विरोध होता. त्यात ज्या काळात प्रेमविवाह दूरच लग्नाआधी पतीचा चेहराही पाहयचा नाही अशा प्रथा पाळल्या जायच्या त्या काळात सुषमा यांनी स्वराज यांच्याशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी आपल्या घरच्यांची या लग्नासाठी समजूत काढून परवाणगी मिळवली.

कॉलेजच्या दिवसांपासूनच होते प्रेम

स्वराज आणि सुषमा कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. पंजाब विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर घरच्यांची परवाणगी मिळाल्यानंतर १३ जुलै १९७५ रोजी लग्न केले. सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या ३४ व्या वर्षी अॅडव्हकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्हकेट जनरल ठरले. तर वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी १९९० ते १९९३ या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.