भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची पुढील महिन्यामध्ये भेट होऊ शकते. अमेरिकेमध्ये पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांची वार्षिक महासभा होणार आहे. यावेळी स्वराज आणि कुरेशी यांची भेट होऊ शकते, असं वृत्त पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे.

जर ही भेट झाली तर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय भेट ठरू शकते. ही भेट होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं डॉनने अमेरिकेतील एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताला अदयाप दुजोरा मिळालेला नाही.

18 सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 73 व्या वार्षिक महासभेला सुरूवात होत आहे. यामध्ये 29 सप्टेंबर रोजी सुषमा स्वराज या भारताकडून संयुक्त राष्ट्रांमध्ये संबोधन करणार आहेत.

पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात भारतासोबतचे संबंध चांगले बनवायचे आहेत असं म्हटलं होतं. दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या प्रश्नावरुन वाद आहे, हे मान्य करताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील वाद सोडवता येतील असं म्हटलं होतं. संबंध सुधारण्यासाठी जर भारताने एक पाऊल उचललं तर पाकिस्तान दोन पावलं उचलेल असं इम्रान म्हणाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.