आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित सट्टेबाजीच्या घोटाळ्यात अडकलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनची प्रवासविषयक कागदपत्रे मिळवून देण्यात मदत केल्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी केंद्र सरकार व भाजपने मात्र स्वराज यांची जोरदार पाठराखण केली आहे. स्वराज यांनीही मोदी यांना मानवी दृष्टिकोनातून मदत केल्याचे स्पष्ट करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत झालेली कथित सट्टेबाजी (बेटिंग) आणि पैशांचा अपहार प्रकरणात अडकल्यामुळे या प्रकरणी भारतात ‘वाँटेड’ असलेले ललित मोदी तपासाचा ससेमिरा टाळण्यासाठी २०१० सालापासून लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. प्रवासविषयक कागदपत्रे (ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स) मिळवून देण्याची शिफारस करण्यासाठी सुषमा स्वराज या भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार किथ वाझ आणि ब्रिटनचे राजदूत जेम्स बेव्हन यांच्याशी बोलल्या, असे ई-मेल्स उघड होणे, हे या वादाचे मूळ आहे.
ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी उद्धृत केलेल्या या ई-मेल्सनुसार, वाझ यांनी ललित मोदी यांना प्रवासाची कागदपत्रे देण्याकरता सुषमा स्वराज यांचे नाव वापरून ब्रिटनच्या उच्चपदस्थ इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर दबाव आणला. परिणामी मोदी यांना २४ तासांच्या आत ही कागदपत्रे मिळाली. स्वराज यांचे पुतणे ज्योतिर्मय कौशल यांना ब्रिटनमधील कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यातही वाझ यांनी मदत देऊ केली, असेही अहवालात म्हटले आहे.
ललित मोदींबाबतचा वाद
वादग्रस्त ठरलेले ललित मोदी यांचा पासपोर्ट तत्कालीन संपुआ सरकारने २०११ साली रद्द केला होता. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तो बहाल केला. आपण काही चुकीचे केले नसून, जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे देश सोडल्याचे मोदींनी म्हटले होते. तथापि, संपुआ सरकारने ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवून, तुम्ही मोदी यांना प्रवासाची कागदपत्रे दिल्यास भारत- ब्रिटन यांचे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असे कळवल्यामुळे ब्रिटिश सरकारवर र्निबध होता. ही कागदपत्रे दिल्यास आपले संबंध बिघडणार नाहीत, असे सुषमा स्वराज यांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी बोलताना स्पष्ट केले.

अमित शहांची टीका
ललित मोदी यांचा मुद्दा वादग्रस्त ठरत असल्याचे पाहून सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपली बाजू मांडली. बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी ओटाविओ क्वाट्रोची यांना भारतातून पळून जाण्यात मदत करणे आणि युनियन कार्बाइडचे प्रमुख वॉरन अँडरसन यांना देश सोडून जाण्यात मदत करणे यापेक्षा हे प्रकरण वेगळे असल्याचा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला.
काँग्रेस आक्रमक
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुर्जेवाला यांनी  स्वराज यांनी  राजीनामा देण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे ‘आप’ चे प्रवक्ते आशुतोष म्हणाले.

जुलै २०१४ मध्ये ललित मोदी यांनी माझ्यााशी संपर्क साधला. कर्करोगग्रस्त पत्नीवर पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रिया करावयाची असल्याचे सांगितले. या प्रकरणी मानवी दृष्टिकोन स्वीकारत  मोदी यांच्या विनंतीची तपासणी करून त्यांना प्रवासाची कागदपत्रे द्यावीत असे ब्रिटिश उच्चायुक्तांना कळवले.
 – सुषमा स्वराज

*छायाचित्रामध्ये: २०१० मध्ये आयपीएलमधील  एका सामन्यादरम्यान मोदी व स्वराज यांची भेट झाली होती.