रेल्वेतील पत्नीच्या बदलीसाठी ट्विटरवर विनंती करणारा पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअर सुषमा स्वराजांच्या तडाख्यात

‘‘तू किंवा तुझी पत्नी जर परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी असता आणि तुम्ही ट्विटरवरून बदलीची मागणी केली असती तर मी आतापर्यंत तुमच्या हाती निलंबनाचा आदेशच सोपविला असता..’’

एरव्ही जगभरात कोठेही अडचणीत सापडलेल्या भारतीयांना रात्री-अपरात्री आणि रुग्णालयात मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी दाखल असतानाही ट्विटरवरून अखंडपणे मदत करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या संतापाला एका पुणेकर सॉफ्टवेअर इंजिनीअरला सामोरे जावे लागले तेही ट्विटरवरून. पुढे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनीही हस्तक्षेपास नकार देऊन ‘वनवास संपविण्या’साठी धडपडणाऱ्या त्या इंजिनीअरच्या प्रयत्नांवर पाणी फेरले.

ट्विटरवरील माहितीनुसार, त्याचे नाव स्मित राज. तो पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील सायबरसिटीतील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. त्याची पत्नी  रेल्वेत आहे; पण नियुक्ती आहे उत्तर प्रदेशातील झांशी येथे. त्यामुळे तिची बदली पुण्यामध्ये करून ‘वनवास संपविण्या’साठी त्याची धडपड चालू असल्याचे दिसते. डिसेंबरमध्ये त्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना ट्वीट पाठविले होते आणि बदलीसाठी अनेक दरवाजे ठोठावले. माहितीच्या अधिकाराचा आसरा घेतला. पण कोठूनही प्रतिसाद न मिळाल्याने निराश झाल्याचे त्यामध्ये नमूद केले. पण सर्वसाधारपणे ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या प्रभूंकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

पण त्याच वेळी सुषमा स्वराज यांचे एक ट्वीट त्याने वाचले आणि आशेचा किरण चमकला. पत्नीचा पासपोर्ट मिळत नसल्याने अमेरिकेत एकटा पडल्याचे ट्वीट न्यूजर्सीमधील संजय पंडिता याने केले होते. त्याला त्वरित प्रतिसाद देताना तुमचा वनवास लवकरच संपण्याची टिप्पणी सुषमांनी केली होती. तोच धागा पकडून स्मित राजने एक सुषमांना ट्वीट पाठविला आणि त्यात लिहिले की, ‘‘कृपया तुम्ही आमचा भारतातील वनवास संपविण्यासाठी मदत करू शकता का? माझी पत्नी रेल्वेमध्ये झांशी येथे काम करते; मी पुण्यात आयटी कंपनीत काम करतो. एक वर्ष होऊन गेले..’’

पण बदलीची मागणी ट्विटरवरून केल्यामुळे सुषमा चांगल्याच भडकल्या आणि असला बेशिस्तीचा प्रकार खपवून घेणार नसल्याचे ट्विटरवरूनच सुनावले. सुषमांच्या या अनपेक्षित पावित्र्याने स्मित राज गडबडला आणि त्याने पुन्हा त्यांनाच साकडे घालताना लिहिले की, ‘‘इथवर पोचण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली, आता एकत्र जगण्यासाठी खूप धडपडतोय. म्हणून तर मदतीसाठी विनंती केली होती. तुम्ही कृपया समजून घ्या..’’

यावर सुषमांनी प्रतिसाद दिला नाही, मात्र त्याची ट्वीटरूपी विनंती प्रभूंकडे सरकवली. पण रेल्वेमंत्र्यांनी चक्क असाहाय्यता व्यक्त केली आणि उलट-टपाली लिहिले, ‘‘माझ्या निदर्शनास मुद्दा आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण धोरणात्मक निर्णयानुसार, मी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करीत नाही. त्या संदर्भातील अधिकार रेल्वे मंडळाला दिले आहेत.’’