कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून माझ्यावर दबाव आणण्यात येत होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. स्वराज यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली असून मी आज सभागृहात त्या काँग्रेस नेत्याचे नाव जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदियाविरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी समन्स जारी केले होते. याशिवाय, येत्या १८ ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस पक्ष सातत्याने सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर पलटवार करण्याच्यादृष्टीने सुषमा स्वराज यांच्याकडून ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज सभागृहात सुषमा स्वराज काय बोलणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.