माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. त्यांनी शनिवारी सकाळी टि्वटरवरुन याची माहिती दिली. नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत सुषमा स्वराज यांनी सरकार निवासस्थान रिकामे केले आहे. ८, सफदरजंग लेन मार्गावरील मी माझे सरकारी निवासस्थान सोडले आहे. आता मी आधीचा पत्ता आणि फोन नंबरवर उपलब्ध नसेन अशी माहिती सुषमा स्वराज यांनी टि्वटमधून दिली आहे.

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्या सहभागी झालेल्या नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेल्या सेवेबद्दल टि्वटरवर अनेकांनी सुषमा स्वराज यांचे कौतुक केले आहे.

आधुनिक भारताच्या तुम्ही प्रतिष्ठीत नेत्या आहात. तुम्ही सरकारी निवासस्थान सोडले असेल. पण तुमचे स्थान वर्षानुवर्षे आमच्या ह्दयात कायम राहील. तुमच्या सारख्या नेत्यांमुळे राजकारणाचे जग चांगले आहे अशा शब्दात अनुपम खेर यांनी सुषमा स्वराज यांचा गौरव केला आहे. सुषमा स्वराज (६७) यांनी आपल्या कार्यकाळात परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना मदत केली. टि्वटरवरुन कोणीही मदत मागितल्यास त्यांनी लगेच प्रतिसाद दिला