माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. स्वराज या खूपच मदतशील होत्या त्यांच्या या गुणाचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. परराष्ट्र मंत्री असताना तर त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. जगात कुठल्याही कोपऱ्यात एखादा भारतीय अडचणीत असला आणि त्याने मदतीसाठी भारत सरकारकडे याचना केली तर सुषमा स्वराज या तत्काळ त्या व्यक्तीच्या मदतीसाठी सुत्रे हालवत असतं, अशाच प्रकारे त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या आणि तेथेच प्राण सोडलेल्या सरबजीत सिंह यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी.

दलबीर कौर म्हणतात, सुषमा स्वराज आपल्याला सोडून गेल्या आहेत यावर माझा विश्वासच बसत नाही. त्या खूपच लवकर आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी नेहमीच इतर देशात अडलेल्या भारतीयांना मदतीचा हात दिला, त्या नेहमची मदतीसाठी तत्पर असायच्या.

हमीद अन्सारी, सरबजीत, गीता आणि कुलभूषण जाधव अशा पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना त्यांनी मोलाची मदत केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करते असे दलबीर कौर यांनी म्हटले आहे.