परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या व्हीव्हीआयपी विमानाचा दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान काही काळासाठी संपर्क तुटल्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. शनिवारी, त्रिवेंद्रम ते मॉरिशसदरम्यान ही घटना घडली होती. त्यांच्या विमानाचा १२ ते १४ मिनिटे संपर्क तुटल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान, केरळच्या त्रिवेंद्रम येथील विमानतळावरुन त्यांच्या व्हीव्हीआयपी मेघदूत या विमानाने उड्डाण केले. त्यानंतर मॉरिशसच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतरही त्यांचे विमान सुमारे १५ मिनिटे रडारवरुन गायब झाले होते. त्यांच्या विमानातील संपर्क यंत्रेणेसोबत या काळात कंट्रोल युनिटचा संपर्क तुटला होता. यामुळे काही काळासाठी संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांमध्ये भीतीने चांगलीच धडकी भरली होती.

एअर ट्रॅफिक कन्ट्रोलचे काम पाहणाऱ्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या समुद्रातील हवाई हद्दीत एअर ट्रॅफिक कन्ट्रोलशी विमानाचा संपर्क होत नव्हता. मात्र, विमान गायब झाल्याचे जाहीर करण्यासाठी त्यांनी ३० मिनिटे वाट पाहिली. त्यानंतर स्वराज यांच्या विमानाने मॉरिशसच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर १२ मिनिटांनंतर अथॉरिटीने धोक्याची घंटा वाजवली, कारण या काळात विमानाशी कुठलाही संपर्क होऊ शकत नव्हता. तर, दुसरीकडे यासंबंधी माहिती उपलब्ध असल्याचा इन्कार परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

मॉरिशसच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर INCERFA हा आलार्म वाजवला. या आलार्मचा अर्थ होतो की, विमान आणि त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क साधला. या कार्यालयाशीच स्वराज यांच्या मेघदूत एम्ब्रायर ईआरजे १३५ या विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता.

मेघदूत विमानाने त्रिवेंद्रम येथून शनिवारी (२ जून) संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले होते. एअरपोर्ट अथॉरिटी इंडियाच्या माहितीनुसार, स्थानिक एअर ट्राफिक कन्ट्रोलने (एटीसी) चेन्नईच्या फ्लाइट इन्फर्मेशन रीजनला (एफआयआर) याची माहिती दिली. त्यानंतर चेन्नईने मॉरिशसच्या एफआयआरला याची माहिती दिली. (एक विमान उड्डाणादरम्यान अनेक एफआयआरमध्ये असते त्यामुळे ते त्या संबंधीत हवाई क्षेत्राच्या संपर्कात राहते) त्यानंतर जेव्हा आलार्म वाजवण्यात आला त्यानंतर सर्वच एफआयआर या विमानासाठी सतर्क झाले. त्याचबरोबर भारतीय एअर ट्राफिक कन्ट्रोलने देखील या विमानाशी सातत्याने संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते.

दरम्यान, हे विमान संपर्कात नसल्याबाबत शनिवारी संध्याकाळी ४.४४ वाजता आलार्म वाजवण्यात आला. त्यानंतर स्वराज यांच्या विमानाच्या पायलटने मॉरिशसच्या एटीसीशी ४.५८ मिनिटांनी संपर्क साधला. त्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला. एटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनियमित व्हीएचएफ संपर्कामुळे समुद्रातील हवाई हद्दीत नेहमीच अशी समस्या उद्भवते. समुद्रात रडारची सुविधा उपलब्ध नसते त्यामुळे व्हीएचएफ कम्युनिकेशनचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी व्हीएचएफ कव्हरेज चांगले नसते त्या ठिकाणाला ‘डार्क झोन’ म्हटले जाते.