बेंगळूरु : मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातील संशयिताने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे, अशी माहिती बुधवारी अधिकाऱ्यांनी दिली. ३६ वर्षे वयाचा हा संशयित पोलिस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक कार्यालयात हजर झाला. तेथे त्याला चौकशी व वैद्यकीय चाचण्यांसाठी ताब्यात घेण्यात आले.

आदित्य राव असे या संशयिताचे नाव असून तो मणिपालचा आहे. मंगळूरु  विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रणात दिसलेल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्याशी त्याचे साम्य आहे. विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान मंगळूरु पोलिसांचे एक पथक येथे आले असून ते त्याचे जाबजबाब घेत आहेत. मंगळूरुचे पोलीस आयुक्त पी.एस. हर्ष यांनी सांगितले की, तपास पथक या संशयिताचे जाबजबाब घेणार असून  नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राव याला जाबजबाबासाठी बेंगळूरुतील हासूर गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तो अभियांत्रिकी व एमबीए पदवीधारक आहे. त्याला यापूर्वी २०१८ मध्ये बेंगळूरु विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्या वेळी तो सहा महिने तुरुंगात होता. बेंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी नाकारल्याने त्याने सूडापोटी त्या वेळी खोटा धमकीचा फोन केला होता. राव हा २०१२ मध्ये बेंगळूरुत आला व त्याला नंतर खासगी बँकेत नोकरी मिळाली, पण तेथे त्याने राजीनामा दिला. नंतर तो परत मंगळूरुला गेला व तेथे सहा महिने सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. नंतर उडुपीत पुथीगे मठ येथे तो स्वयंपाकी होता. नंतर तो पुन्हा बेंगळूरुत आला. तेथे एका विमान कंपनीत काम केले, ते काम सोडून पुन्हा त्याने विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी मेंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिकीट खिडकीजवळ एका बेवारस पिशवीत जिवंत स्फोटके सापडली होती. ती नंतर मोकळ्या मैदानावर नेऊन निकामी करण्यात आली. ती स्फोटके ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे.