बिहारमधील बोधगया येथे महाबोधी मंदिर व आसपासच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात गया जिल्ह्य़ातून विनोद कुमार या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. तो बराचाटी येथील रहिवासी आहे. बिहारचे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी सांगितले की, कुमार याला त्याच्या नावाचे ओळखपत्र मंदिराच्या परिसरात सापडल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.
दहशतवाद्यांनी या स्फोटांसाठी कमी तीव्रतेच्या क्रूड बॉम्बचा वापर केला असून त्यात अमोनियम नायट्रेट होते, असे प्रयोगशाळेतील चाचण्यांत निष्पन्न झाले आहे. त्यात टीएनटी किंवा इतर स्फोटक पदार्थाचा अंश मात्र सापडलेला नाही. जे बॉम्ब ठेवण्यात आले होते त्यावर प्रत्येक बॉम्ब कुठे ठेवायचा त्या ठिकाणांची नावे चिकटवण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणाचे नाव इंग्रजी व उर्दूत लिहिलेले होते, असे अभयानंद यांनी सांगितले.  
तीन ते चार दहशतवादी?
नवी दिल्ली : बोधगया येथे रविवारी पहाटे झालेल्या साखळी स्फोटांचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्फोटके ठेवण्याची कामगिरी किमान ३ ते ४ अतिरेक्यांवर सोपविण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला. मंदिराच्या परिसरात सुमारे १३ स्फोटके ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही स्फोटके किमान चार ते पाच किलो वजनाच्या सिलिंडरमध्ये ठेवण्यात आली होती. हे वजन लक्षात घेता हे काम ३ ते ४ दहशतवाद्यांतर्फे करण्यात आले असावे, असे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्फोटके ठेवण्याचे काम नेमके कोणी केले हे कळण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे, मात्र त्यातून अतिरेक्यांचे चेहरे समोर येतीलच असे ठामपणे म्हणता येत नसल्याची खंत तपास यंत्रणांनी व्यक्त केली.

जगभरातील भिक्खूंतर्फे विशेष प्रार्थना
जगभरातील ५० विविध देशांमधील भिक्खूंनी शांतता पुनस्र्थापित व्हावी म्हणून बोधगया मंदिरामध्ये विशेष प्रार्थना केली. सोमवारी संध्याकाळी सुमारे तासभर ही प्रार्थना करण्यात आली. श्रीलंका, थायलंड आणि म्यानमारसह इतर देशांतील बौद्ध भिक्खूंनी या प्रार्थनासभेस हजेरी लावली होती.