तामिळनाडूतून लखनऊच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येत असलेला एक संशयित दहशतवादी इटारसी रेल्वे स्थानकाजवळ हातातील बेडय़ांसह धावत्या गाडीतून उडी मारून पसार झाला, असे पोलिसांनी सांगितले.

सदर संशयित दहशतवाद्याचे नाव सय्यद अहमद अली (३८) असे असून त्याने बुधवारी मध्यरात्री रपतीसादर अतिजलद एक्स्प्रेस गाडीतून उडी मारून पलायन केले, असे होशंगाबादचे पोलीस अधीक्षक आशुतोष प्रताप सिंह यांनी सांगितले.

तामिळनाडूतील वेल्लोर येथून अली याला लखनऊतील रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आणण्यात येत होते. इटारसी स्थानक येण्याच्या बेतात असतानाच त्याने धावत्या गाडीतून उडी टाकली. अली याने ताज महाल आणि उत्तर प्रदेशातील दर्गा उडविण्याची दमकी दिली होती.

ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय उडविण्याची धमकी दिल्यानंतर त्याला तामिळनाडूत ऑक्टोबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. वेल्लोर पोलिसांकडे असलेल्या दस्तऐवजानुसार अली हा मूळचा त्रिपुराचा नागरिक आहे. त्याने बनावट अधिवास प्रमाणपत्र मिळविल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आम्ही ते तपासत आहोत, असे सिंह म्हणाले.

अली हा बांगलादेशचा नागरिक असावा आणि त्याने बेकायदेशीरपणे त्रिपुराचे अधिवास प्रमाणपत्र मिळविले असावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, अली याचा कसून शोध घेतला जात आहे.