09 March 2021

News Flash

दिल्ली हिंसाचार प्रकरण : “हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”; आपच्या निलंबित नगरसेवकाची धक्कादायक कबुली

हुसैनच्या चौकशीच्या अहवालातून समोर आली माहिती

आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्ली हिंसेच्या मागे आपलाच हात असल्याची कबुली हुसैन याने दिली आहे. “जेव्हा २०१७ मध्ये मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हापासूनच पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्याचा विचार माझ्या मनात सुरु होता,” असंही हुसैन म्हणाला आहे. या कामासाठी हुसैनला खालिद सैफी आणि पीएफआय म्हणजेच पॉप्युर फ्रण्ट ऑफ इंडिया या कडवट मुस्लीम संघटनेने मदत केल्याचे हुसैनने कबुली जबाब देताना म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हुसैनच्या चौकशीच्या अहवालामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त देण्यात आलं आहे.

“आपण हिंदूंविरोधात आणि आपल्या समाजासाठी…”

“माझ्या ओळखीतल्या खालिद सैफीने मला तुझ्याकडे राजकीय ताकद आणि पैसा दोन्ही आहे. याचा वापर आपण हिंदूंविरोधात आणि आपल्या समजासाठी करुयात. मी यासाठी कधीही तुझी मदत करायला तयार असेल,” असं हुसैने पोलिसांनी सांगितलं. “काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर सैफी माझ्याकडे आला. आता आम्ही गप्प बसणार नाही. त्याचवेळी राम मंदिर खटल्याचा निकाल आणि सीएए (सुधारित नागरिकत्व कायदा) ही आला. तेव्हा मला पाणी डोक्यावरुन जाऊ लागलं आहे असं वाटू लागलं. काहीतरी केलं पाहिजे अशी भावना माझ्याही मनात निर्माण झाली,” असं पुढे बोलताना हुसैनने सांगितलं.

येथे ठरला दंगली घडवण्याचा प्लॅन

हुसैनने कबुली जबाब नोंदवताना, “८ जानेवारी रोजी खालिद सैफीने माझी भेट जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा (जेएनयू) माझी विद्यार्थी असलेल्या उमर खालिदशी करुन दिली. शाहीन बाग येथील पीएफआयच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली. तिथे खालिदने आपण मारण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. तर खालिद सैफीने पीएफआयचा सदस्य असणारा दानिश हिंदूंविरोधातील लढाईमध्ये आपल्याला आर्थिक मदत करणार आहे,” असं सांगितलं. पीएफायच्या कार्यालयामध्येच आम्ही यासंदर्भातील योजना कयार केली. सरकारला फटका बसेल असं काहीतरी दिल्लीमध्ये करण्याचा आमचा विचार होता. या घटनेनंतर सरकार सीएए कायदा रद्द करेल असं आम्हाला वाटलं होतं. लोकांना चिथवून त्यांना रस्त्यावर उतरवण्याचं काम खालिद सैफीकडे देण्यात आल्याचंही हुसैनने जबाबामध्ये सांगितलं.

हुसैनला मिळालं हे काम

“मला जास्तीत जास्त काचेच्या बाटल्या, पेट्रोल आणि अॅसिड तसेच दगड गोळा करुन छप्परावर ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं. तसेच खालिद सैफीने त्याच्या ओळखीतील लोकांना एकत्र करुन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तयार केलं होतं. खालिदचा मित्र इशरत जहाँ याने शाहीन बागप्रमाणे खुरेजी येथे आंदोलन सुरु केलं. त्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन सुरु झालं. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी अबू फजल इक्लेव्हमध्ये या दंगली घडवण्यासंदर्भात माझी आणि खालिद सैफीची भेट झाली. त्यावेळी उमर खालिदने पैशांची चिंता करु नका त्यासाठी पीएफआय, जामिया कार्डीनेशन कमिटी, राजकीय लोकं, वकील आणि अन्य मुस्लीम संघटना आपली मदत करतील असं आण्हाला सांगितलं. सीएएविरोधात आंदोलन करत असणाऱ्यांना चिथवून रस्ते वाहतूक बंद करण्याचाही विचार आम्ही केला होता. यामध्ये पोलिसांनी किंवा इतर धर्माच्या लोकांनी अडथळा आणल्यास आम्ही लोकांना चिथवून दंगल घडवून आणण्याचा डाव आखला,” असं हुसैन कबुली जबाबामध्ये म्हणाला आहे.

काहीजणांना तयार केलं

“खालिद सैफीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यानच काहीतरी मोठं घडवून आणायचं असं मला सांगितलं. असं केल्यास सरकार माघार घेईल. त्या भेटीमध्ये मी सैफीला भंगरवाल्यांकडून आम्ही दारुच्या आणि थंड पेयाच्या बाटल्या छतावर गोळा करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. घराजवळच सुरु असणाऱ्या एका बांधकामाच्या ठिकाणावरुन दगड गोळा करुन छतावर ठेवले. तसेच आपल्या चारही गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरुन तयार ठेवणार असून बाटल्यांमध्ये इंधन भरुन त्यांचा बॉम्बसारखा वापर करता येईल असंही मी सैफीला सांगितलं. दंगलीच्या वेळी दगडफेक करण्यासाठी आणि बाटल्यांमध्ये इंधन भरुन फेकण्यासाठी काहीजणांना मी तयार करत असल्याचेही सैफीला सांगितलं होतं,” असंही हुसैनने जबाबामध्ये म्हटलं आहे.

खालिदने केलं आवाहन

१७ फेब्रुवारी २०२० रोजी उमर खालिदने ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केल्याचेही हुसैनने सांगितलं. “त्यावेळेस मला अॅसिड गोळा करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. हे अॅसिड पोलिसांवर फेकण्याची योजना होती. मी माझ्या घराच्या छतावर मोठ्या प्रमाणात अॅसिड, पेट्रोल, डिझेल आणि दगड गोळा करुन ठेवले होते. तसेच पोलिसांकडे असलेली माझी पिस्तूलही मी स्वत:च्या ताब्यात घेतली होती. दंगलीमध्ये ती वापरता येईल असा माझा विचार होता,” असं हुसैनने सांगितलं आहे.

दंगल घडवणाऱ्यांना दिल्या होत्या या सूचना

नियोजित प्लॅनप्रमाणे २४ फेब्रुवारी २०२० रोजी हुसैनने अनेकांना त्याच्या घरी बोलवून घेतलं. यामध्ये चांद बागमध्ये राहणारा अरशद कय्यूम, मोनू, कार्यालयाजवळ राहणारा गुलफान, शरद अहमद हाजी, मूंगा नगर येथे राहणारा लियाकत अली, लियाकतचा मुलगा रिशाद अली, दयालपूर येथील मोहम्मद रियान अरशद यांच्यासोबतच हुसैनकडे काम करणारा इलेक्ट्रीशियन मोहम्मद आबाजी, अकाउंट मोहम्मद शादाब, राशिद सैफी आणि भाऊ शाह आलम यांचा समावेश होता. कधी आणि कुठे दगडफेक करायची आहे यासंदर्भातील माहिती  या लोकांना देण्यात आली. तसेच बाटल्यांमध्ये भरलेले अॅसिड आणि पेट्रोल बॉम्ब टाकण्यासंदर्भातील सूचना या लोकांना करण्यात आल्या. केवळ पोलिसांवर आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांवर या समानाचा वापर करण्यास सांगण्यात आलं होतं. आपल्या समाजाच्या लोकांना, स्त्रीयांना आणि मुलांना नुकसान होता कामा नये असंही या लोकांना सांगून ठेवण्यात आलं होतं.

“मी गोळीबार केला आणि…”

“त्याच दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी दीड वाजता मोठी दगडफेक आणि जाळपोळ झाली. कोणताही पुरावा मिळू नये म्हणून, मी मुद्दाम घराच्या छतावर लावलेल्या सीसीटीव्हीच्या वायर कापल्या. मी माझ्या मुलांसहीत संपूर्ण कुटुंबाला दुसरीकडे सुरक्षित स्थळी हलवलं,” असं हुसैन कबुली जबाब नोंदवताना म्हणाला आहे. “माझ्यावर कोणाला संक्षय येऊ नये म्हणून मी खालिद सैफीच्या सांगण्यावरुन वारंवार पोलिसांना फोन करत होतो असंही हुसैन म्हणाला. मी आणि माझा भाऊ शाह आलम यांनी घराच्या छतावरुन गोळीबार केला. त्यानंतर मी ठिकठिकाणी लपत होते. मात्र पोलिसांनी मला अटक केली,” असं हुसैन म्हणाला.

सध्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी हुसैनबरोबरच १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. खालिद सैफीलाही अटक करण्यात आली आहे. तर उमर खालिदची शनिवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. तसेच दंगलीसंदर्भातील चौकशीनंतर तपासासाठी त्याचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 8:01 am

Web Title: suspended aap councillor tahir hussain admits his role in delhi violence scsg 91
Next Stories
1 अमित शहा यांना करोना
2 व्याघ्र प्रकल्पांमध्ये श्वानांची संख्या अधिक
3 ‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी
Just Now!
X