दिल्लीतील एका उद्योजकाच्या हत्येचा कट रचल्याबद्दल हरयाणा कॅडरचे आयएएस अधिकारी संजीव कुमार यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
हरयाणात ३ हजार २०६ कनिष्ठ शिक्षकांची बेकायदेशीररीत्या नेमणूक केल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, त्यांचे आमदार पुत्र अजय चौटाला आणि इतर ५३ जणांसह दिल्लीच्या एका न्यायालयाने शिक्षा सुनावलेले १९८५ च्या तुकडीचे अधिकारी कुमार हे सध्या पॅरोलवर बाहेर होते.
मित्र आणि जवळचा सहकारी असलेल्या एका उद्योजकाचा खून करण्याचा कट रचल्याबद्दल संजीवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. संजीव हे चौटालांसोबत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना हा कट रचण्यात आला, असे दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मालमत्तेबाबत वाद झाल्यामुळे कुमार हे त्यांच्या मित्राचा काटा काढू इच्छित होते. स्वत:ला जखमी करून घेऊन जामीन मिळवण्याची त्यांची इच्छा होती. इतकेच नव्हे, तर आपण व आपल्या मित्रावरील हल्ल्यासाठी चौटाला यांना जबाबदार ठरवण्याचे त्यांचे प्रयत्न होते, असेही हा अधिकारी म्हणाला.