मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर, राज्यातील भाजपा नेतृत्वात बदल होत असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे तारकिशोर प्रसाद सिंह व रेणुदेवी यांची नावं उपमुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असल्याचे समोर येत आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचं जाहीर केलं होतं. तर, भाजपाच्या विधीमंडळ उपनेतेपदी रेणुदेवी यांची निवड झाल्याबद्दल सुशीलकुमार मोदी यांनी त्यांचे देखील अभिनंदन केले आहे.

“माझ्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे आणि मी माझ्या क्षमतेने उत्तम कर्तव्य बजावीन,” अशी प्रतिक्रिया तारकिशोर प्रसाद सिंह यांनी भाजपाचे विधिमंडळ नेते पदावर निवड झाल्यावर दिली. तसेच, तुम्ही नितीश कुमार यांचे उपमुख्यमंत्री होणार आहात का? असे विचारण्यात आल्यावर त्यांनी मी आताच यावर काही भाष्य करू शकत नसल्याचे म्हटले होते. तर, रेणुदेवी यांनी देखील आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचं सांगितलं आहे.

या सर्व घडामोडींदरम्यान सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “भाजपा तसंच संघ परिवाराने मला ४० वर्षाच्या राजकीय जीवनात इतकं दिलं आहे जे इतर कोणाला मिळालं नसेल. यापुढेही जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही,” असं सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”.