केरळच्या अलापुझा समुद्र किनाऱ्यावरील खोल समुद्रात संशयास्पदरीत्या वावरणारी मच्छीमारी नौका जप्त करण्यात आली असून नौकेवरील १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून उपग्रह दूरध्वनी जप्त करण्यात आले आहेत.
तटरक्षक दलाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले सर्व जण इराणचे असून त्यांच्यापैकी एकाकडे पाकिस्तानचे ओळखपत्र सापडले आहे. त्यांच्या भारतीय हद्दीत येण्यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्वाची चौकशी केरळ पोलीस करत आहेत.
या नौकेतून उच्च वारंवारितेच्या संदेशांची देवाणघेवाण होत असल्याचे भारतीय तपास यंत्रणांच्या ३ जुलै रोजी निदर्शनास आले होते. मात्र खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशी या नौकेचा ठावठिकाणा तटरक्षक दलाला समजू शकला. यानंतर कारवाई करण्यात आली. चौकशी अहवाल एनआयएकडे सुपूर्द केला जाणार आहे.