पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत मोहीम’ कार्यक्रमाच्या प्रमुख सचिव असलेल्या सनदी अधिकारी विजयलक्ष्मी जोशी यांनी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विजयलक्ष्मी जोशी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी वैयक्तिक कारण दिले असून त्यांच्या विनंतीचा विचार केला जात आहे. जोशी या गुजरात श्रेणीच्या १९८० च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांचा सेवाकाल पूर्ण होण्यास अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे.
वृद्ध पालकांची देखभाल करण्यासाठी आपल्याला ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत सेवामुक्त करावे, असा अर्ज त्यांनी जुलै महिन्यांत केला होता. त्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे, असे कार्मिक विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
माजी केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी गेल्या सोमवारीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यापाठोपाठ जोशी यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आले आहे.