News Flash

मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांवर आधारित धडे आता शालेय पाठ्यपुस्तकात!

वेश्यांचा उल्लेख असणारा भाग वगळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’ आणि ‘नोटाबंदी’ यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांचे कौतुक करताना भाजप नेते कधीच थकत नाहीत, हे आजवर आपण अनेकदा पाहिले असेल. या निर्णयांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला नव्या उंचीवर नेऊन ठेवले, असा दावाही भाजप नेते करतात. या पार्श्वभूमीवर आता देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, या हेतूने ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांमध्ये या निर्णयांचा व योजनांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या केंद्र सरकारकडून शालेय अभ्यासक्रमामध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सल्लागार म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या स्वायत्त संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘एनसीईआरटी’कडून अभ्यासक्रमात बदल करण्याच्यादृष्टीने देशभरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ‘एनसीईआरटी’ने विविध विषयांच्या १८२ पाठ्यपुस्तकांममध्ये बदल केले आहेत. त्यासाठी शिक्षकांनी केलेल्या २२१ आणि अन्य माध्यमातून आलेल्या १,११३ सूचनांची दखल घेण्यात आली. या सूचनांनुसार सहावी ते बारावी इयत्तेच्या विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वाधिक ५७३, सामाजिक शास्त्र ३१६ आणि संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकात १३६ सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 

पाठ्यपुस्तकांमधून रवींद्रनाथ टागोरांचा उल्लेख वगळणार नाही- प्रकाश जावडेकर

सूत्रांच्या माहितीनुसार, आता प्राथमिक इयत्तेतील गणिताच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भाजप सरकारने चलनात आणलेल्या नव्या नोटांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. तर दहावीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात निश्चलनीकरण, कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी सरकारने घेतलेले निर्णय, जीएसटी या सगळ्याची माहिती देणाऱ्या ‘अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ या नावाने स्वतंत्र धड्याचा समावेश करण्यात आलाय. याशिवाय, रस्ते सुरक्षेसाठी मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आठवी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातही नव्या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मोदी सरकारने सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया मोहिम’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘बेटी बचाओ’, बेटी पढाओ’ उपक्रमांना अन्य पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

इयत्ता आठवीच्या संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकातही एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वीच्या आठवी इयत्तेच्या ‘रुचिरा’ पाठ्यपुस्तकात ‘भगवदज्जुकम्’ या संस्कृत नाटकाचा भाग होता. यामध्ये काही ठिकाणी वेश्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे हा पाठ शिकवताना विद्यार्थ्यांना वेश्यांविषयी सांगताना शिक्षकांची अडचण होते, असा आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यामुळे नव्या पाठ्यपुस्तकातून ‘भगवदज्जुकम्’ नाटकाचा उतारा वगळण्याचा निर्णय ‘एनसीईआरटी’ने घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 1:30 pm

Web Title: swachh bharat beti bachao noteban to be in ncert books
टॅग : Rss
Next Stories
1 कर्ज फेडा किंवा कंपनी विका; जेटलींचा थकबाकीदार खासगी कंपन्यांना इशारा
2 ब्लू व्हेलचा आणखी एक बळी
3 ‘दाऊद कराचीत असेलही, पण आम्ही भारताला का मदत करू?’
Just Now!
X