लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि तेथील स्थानिक भारतीयांनी तेथे आगळ्यावेगळ्या प्रकारे स्वच्छ भारत मोहिम राबवली. पाकिस्तानी समर्थकांनी ३ सप्टेंबर रोजी भारतीय उच्चायुक्तालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर झालेला कचरा भारतीयांनी साफ केला.

अनेक भारतीयांनी पाण्याच्या बादल्या, झाडू आणि साफसफाईच्या गोष्टी घेऊन उच्चायुक्तालयासमोरील परिसर स्वच्छ केला. भारताचे लंडनमधील उच्चायुक्त रुची घनशाम आणि उपायुक्त चरण जीत सिंह सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. लंडनमधील इंडियन हाऊसबाहेर पाकिस्तानी नागरिकांनी कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान बराच कचरा करुन ठेवला होता. हाच कचरा साफ करण्यासाठी भारतीय लंडनच्या रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले.

पाकिस्तानी समर्थकांनी इंडियन हाऊसच्या इमारतीवर अंडी, टोमॅटो, स्मोक बॉम्ब, काचेच्या बाटल्या फेकून मारल्या होत्या. या सर्व गोष्टींचे डाग इमारतीवर दिसत होते. ही इमारत स्वच्छ करण्याची इच्छा लेखापरीक्षण संचालक गौरव महना यांनी उच्चायुक्तांना पत्र लिहून कळवली. या कामामध्ये स्थानिक भारतीय सहभागी होऊ इच्छित असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. या मोहिमेसाठी तिरंगी कपड्यांमध्ये हातात झाडू घेऊन आलेल्या गौरव यांनी ‘शांततापूर्ण मार्गाने स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मला भारताचे म्हणणे जगासमोर मांडायचे आहे,’ असे मत व्यक्त केले.

‘आम्ही आमचे घर स्वत: स्वच्छ करतो. आम्ही दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकत नाही. आम्ही स्वच्छ भारत मोहिम लंडनमध्ये आणली. आम्ही महात्मा गांधीच्या तत्वांवर चालतो हे दाखवून दिले,’ असे मत उच्चायुक्त रुजी घनश्याम यांनी व्यक्त केले. या मोहिमेसाठी जमलेल्या भारतीयांनी इंडिया हाऊसच्या भिंती आणि लाद्या स्वच्छ केल्या.

स्थानिकांनाही भारतीयांनी स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

५ ऑगस्ट रोजी भारताने कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात पहिल्यांदा प्रस्ताव मांडल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. मागील एका महिन्यामध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर दोन वेळा पाकिस्तानी समर्थकांनी आंदोलन केले आहे.

पहिले आंदोलन १५ ऑगस्टला झाले. यावेळी पाकिस्तानी समर्थकांनी भारतीयांवर अंडी, टॉमॅटो आणि पाण्याच्या बाटल्यांचा मारा केला होता. अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारतीयांना शिविगाळही केला होता. असेच आंदोलन ३ सप्टेंबर रोजीही झाले होते.

या हल्ल्यांप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली नंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली.