दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिनेता कमल हसन हे दोघेही ‘झीरो’ आहेत. या दोघांच्या भेटीला काहीही अर्थ नाही अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. ते ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते. दोन शून्यांची भेट होऊन काहीही उपयोग होणार नाही असेही त्यांनी म्हटले. कमल हसनने आधी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली होती. या भेटीनंतर मात्र अरविंद केजरीवाल यांनी कमल हसनच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. नेमक्या याच भेटीवर सुब्रमण्यम स्वामींनी निशाणा साधला.

कमल हसन हा मूर्ख असून हिरो नाही झीरो आहे. तसेच त्याने दुसऱ्या शुन्याची (केजरीवाल) भेट घेतली आहे. दोन शून्यांची बेरीज केली तरीही उत्तर शून्यच येते हे आपण शिकलो आहोत. त्याचमुळे या भेटीतून काहीही साध्य होणार नाही असा टोला स्वामी यांनी लगावला आहे. एवढेच नाही तर अभिनेत्यांना राजकारणात यायची गरजच काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित पत्रकारांना विचारला. गुरूवारी अरविंद केजरीवाल यांनी चेन्नईत जाऊन कमल हसनची भेट घेतली. या दोघांनी स्नेहभोजनही केले. यानंतर कमल हसन लवकरच राजकारणात एंट्री मारणार असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच कदाचित तो ‘आप’ या पक्षात जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात आली.

तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या ‘एआयएडीएमके’च्या नेत्यांवर कमल हसनने टीका केली होती. अरविंद केजरीवाल माझ्या भेटीला आल्याचा मला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया कमल हसनने दिली. तसेच लवकरच राजकारणात जाणार असल्याचेही संकेत दिले. तर कमल हसन यांचा मी चाहता आहे. ते राजकारणात आले तर चांगल्या मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री वाटते असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मात्र या भेटीवरच भाजपने टीका केली आहे.