शबरीमला प्रकरणावरून केरळमध्ये तणावाची परिस्थिती असून महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांना हिंसक वळण मिळाले असून केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर चार गावठी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा दाखला देत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावरून टीका केली आहे. ‘पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. यांनासुद्धा फाशीची शिक्षा होणार का? भगवा दहशतवाद हा खरा आहे,’ अशा शब्दांत स्वराने आरएसएस आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला. पण यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. कन्नूर, पेराम्ब्रा, मलापुरम, अदूर येथे हिंसाचार झाला आहे. तेथे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळीही काही हल्ले झाले. कन्नूर व राज्यातील इतर भागात जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचे पोलिस प्रमुख लोकनाथ बेहेरा यांनी राज्यव्यापी सतर्कता इशारा दिला आहे.

राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. आरएसएसनं केरळला वॉर झोन बनवून ठेवलं आहे, अशी टीका त्यांनी केली होती.