स्वराज अभियान संघटनेत भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे नेते अण्णा हजारे यांना आताच सामील करून घेतल्यास त्याला व्यक्तिमत्त्व पंथाचे स्वरूप येईल, त्यामुळे त्यांना नंतरच्या काळात सामील केले जाईल पण सध्या त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनी येथे सांगितले.
आम्हाला इच्छा झाली तर आम्ही त्यांना नक्की मार्गदर्शनासाठी सामील करून घेऊ पण सध्या तरी आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सामील होण्यासाठी आवाहन करणार नाही, आम्ही तसे केले तर त्याला ‘आप’सारखे व्यक्तिमत्त्व पंथाचे स्वरूप येईल.
आपमधून बाहेर पडलेल्या योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी स्वराज अभियानाची स्थापना केली आहे. अण्णा हजारे यांनी स्वराज अभियानात येण्यास नकार दिलेला नाही व आम्हीही त्यांच्याकडे नेतृत्व मागण्यासाठी गेलेलो नाही, आम्ही सामान्य लोकांना भेटत आहोत जे भारतासाठी लढा देत आहेत, ते व्यक्तींपेक्षा महत्त्वाचे आहे.
‘आप’ बाबत टिप्पणी नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास त्यांनी नकार दिला, कुठल्याही मुख्यमंत्र्याचे मूल्यमापन करण्यासाठी जास्त वेळ द्यायला हवा, त्यामुळे केजरीवाल यांचे मूल्यमापन आताच करणे योग्य होणार नाही असे त्यांनी सांगितले.
आपच्या रोजच्या कामकाजावर टीकाटिप्पणी करायची नाही असे आमचे धोरण आहे, प्रसारमाध्यमांना ते आवडत असले तरी आम्ही तसे करणार नाही. आम्ही तोमर यांच्याविषयी टिप्पणी केली होती, दिल्ली सरकारच्या जाहिरातींवर तसेच नायब राज्यपालांशी झालेल्या वादांवर टिप्पणी केली होती कारण ते धोरणात्मक विषय होते.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी न्याय्य आहे, कुठल्याही निर्वाचित सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार आहे पण राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्षांचे राजकारण अपरिपक्वपणाचे आहे. आपच्या नेत्यांनी काही मुद्दय़ांवर तडजोडी केल्या असल्या, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नाहीत, असे सांगून यादव म्हणाले,
की पक्षातून काढल्याचे पत्र आपल्याला अजून मिळालेले नाही. दूरचित्रवाणी माध्यमातूनच ते कळले. आपच्या शिस्तभंग समितीला आपण हकालपट्टीचे पत्र पाठवण्याची मागणी केली आहे.

बिहार विधानसभेत बहुमताचा राजनाथ यांना विश्वास
गाझियाबाद: बिहार विधानसभेच्या निवडणुका ‘सुशासन आणि विकास’ या मुद्दय़ांवर लढवल्या जातील, असे सांगून या निवडणुका बहुमताने जिंकण्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

बिहारमधील आगामी निवडणुका जात किंवा धर्माच्या नावावर लढल्या जाणार नाहीत. सुशासन आणि विकास यांच्या आधारे भाजप त्या जिंकेल, असे खासदार के. सी. त्यागी यांच्या भावाच्या मृत्यूबाबत शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी येथे आलेले सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५३ कोटी रुपयांची मदत पाठवली, परंतु ती  योग्यरीत्या वितरित करण्यात आली नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.