भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सार्वजनिक जीवनात सचोटी बाळगण्यावर भर दिल्याच्या पाश्र्वभूमीवर, ललित मोदी यांच्यासंबंधीच्या वादाबाबत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ‘जबाबदारी स्वीकारावी’, असे आवाहन विरोधी पक्षांनी केले आहे.
मंत्र्यांविरुद्ध आरोप झाल्यानंतर, ते त्यात अडकले असतील तर त्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे स्पष्ट संकेत भाजपच्या वरिष्ठतम नेत्याने दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी याबाबत नि:संदिग्ध स्पष्टीकरण द्यायला हवे, परंतु तसे काहीही होत नाही. अडवाणी यांनी याच संदर्भात त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे अडवाणी यांच्या मतामध्ये सामान्य लोकांचे विचार प्रतिबिंबित झाले आहेत, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.सी. चाको म्हणाले.
सत्ताधारी भाजपला राजकीय नैतिकतेच्या मार्गावर चालायचे नाही हे आता स्पष्ट झाले असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. आपण ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असल्याचा त्यांचा दावा होता. हा ‘डिफरन्स’ काय आहे? त्यांना त्यांच्या स्वत:च्या लोकांना वाचवायचे आहे. त्यांना राजकीय नैतिकता पाळायची नाही हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनी याबाबतच सावधगिरीचा इशारा दिला आहे, असेही कुमार यांनी सांगितले.