विज्ञान काल्पनिकातील संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार असून यंत्रमानवांचा समूह मानवाच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या यंत्रमानव आहेत, पण ते वेगवेगळे काम करतात. यापुढे ते समन्वयाने काम करू शकतील. शेफिल्ड सेंटर फॉर रोबोटिक्स  व शेफील्ड हालम विद्यापीठ येथील  संशोधकांनी एकूण ४० यंत्रमानवांचे प्रोग्रामिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंत्रमानवांच्या समूहावर नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य होणार आहे. अगदी लष्करापासून वैद्यक क्षेत्रापर्यंत सगळीकडे यंत्रमानवांचा वापर केला जातो. यंत्रमानवांचा समूह हा एखादी मोठी वस्तू उचलण्याचे काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो.
यंत्रमानव खोलीत वेगवगेळे काम करताना दिसत असले तरी ते समन्वयाने काम करू शकतात. नॅचरल रोबोटिक्स लॅबचे प्रमुख डॉ. रॉडरिच ग्रॉस यांनी सांगितले की, मानवी शरीराला कुठेही छेद न देता नॅनोबोटस (सूक्ष्म यंत्रमानव) हे काम करू शकतात. लष्करातही ते मदतकार्यात सहभागी होऊ शकतात. जिथे माणसाला जाणे धोकादायक आहे तिथे ते जाऊ शकतात व कारखान्यातील उत्पादनातही सुधारणा करू शकतात. समूहात काम  करण्यासाठी तयार केलेल्या आज्ञावलीची संकल्पना साधी आहे.
यात यंत्रमानवांना एकत्र येण्याची आज्ञा केली जाते. प्रत्येक यंत्रमानव त्याच्या आजूबाजूला असलेल्या यंत्रमानवाला कार्यान्वित करतो. जर तो सापडला नाही तर मोठय़ा वर्तुळात त्याचा शोध घेत राहतो.
ग्रॉस यांनी सांगितले की, यंत्रमानवांना चालवण्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करीत आहोत, यात यंत्रमानवाला कुठलेही काम पार पाडण्यासाठी किमान माहिती उपलब्ध करून दिली जाते. या पद्धतीमुळे यंत्रमानवांना स्मृती लागत नाही किंवा प्रोसेसिंग युनिटही लागत नाही. परिणामी अतिशय लहान यंत्रमानव तयार करणे शक्य आहे.