फेसबुक लाईव्हची लोकप्रियता वाढत असतानाच या फिचरचा आता दुरुपयोगही केला जात असल्याचे समोर आले आहे. ‘फेसबुक लाईव्ह’ सुरु करुन स्वीडनमध्ये तीन नराधमांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. एका सतर्क फेसबुक युजरने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला.

फेसबुकवर एक क्लोज ग्रुप असून या ग्रुपमध्ये सुमारे ६० हजार सदस्य आहेत. या ग्रुपवर रविवारी सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ लाईव्ह दाखवला जात होता. याप्रकाराची माहिती जोसफिन ल्यूडग्रेन नामक तरुणीने पोलिसांनी दिली. जोसफिनच्या सतर्कतेमुळेच हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नराधमांनी सामूहिक बलात्काराचे फोटो स्नॅपचॅटवरही शेअर केले होते. याप्रकरणी पोलिसांनी १८, २० आणि २४ वर्षाच्या तीन तरुणांना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. फेसबुकवरुन हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन पीडितेची सुटका केली असून घटनेच्या वेळी ती हल्ल्यामुळे बेशुद्धावस्थेत होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्थानिक पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घटनेप्रकरणी सोशल मीडिया युजर्सनी सहकार्य करणाचे आवाहन केले आहे. आमच्याकडे या प्रकरणातील छायाचित्र आणि व्हिडीओ आहेत. पण बलात्कारापूर्वी झालेल्या हल्ल्याचे फुटेज आम्हाला हवे असल्याचे पोलिसांनी सांगितले, स्वीडनमधील प्रसारमाध्यमांनी या व्हिडीओतील काही भाग प्रकाशित केला आहे. यामध्ये एका नराधमाच्या हातात बंदुक असल्याचे दिसते.
दरम्यान, फेसबुकच्या प्रवक्त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. आमची टीम युजर्स फेसबुकवर काय लाईव्ह दाखवतात यावर लक्ष ठेवून आहे. याप्रकरणात आम्ही पोलीस तपासात सहकार्य करु असे आश्वासनही फेसबुकने दिले आहे.