प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्री श्वेता मेनन यांनी  काँग्रेसचे कोल्लम येथील खासदार पीतांबर कुरूप यांच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. शुक्रवारच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री श्वेता मेनन हिचा विनयभंग केल्याची फिर्याद कुरूप यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. त्यांच्यावर भादंवि ३५४ व ३५४ (ए) कलमान्वये महिलेविरुद्ध बळाचा वापर व विनयभंगाचा आरोप दाखल केला आहे.
कोल्लम येथील बोट रेस इव्हेंटच्यावेळी काँग्रेसचे खासदार कुरूप यांनी आपला विनयभंग केल्याचे निवेदन त्यांनी पोलिसांसमोर दिले असून पोलिसांचे पथक महिला परिक्षेत्र अधिकाऱ्यांना घेऊन कोल्लम येथे सकाळी नऊ वाजता गेले होते. त्यांनी श्वेता यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची जबानी घेतली. निवेदन करीत असताना श्वेता यांना रडू कोसळले. पोलीस पथकाने या घटनेबाबत आणखी काही सांगण्याचे टाळले आहे. कोल्लमचे खासदार कुरूप व इतर दोघांची नावे या प्रकरणात श्वेताने घेतली असून कुरूप यांनी श्वेताचा विनयभंग केल्याचा आरोप फेटाळला आहे. काल रात्री श्वेता मेनन हिने चित्रपट कलाकार संघटनेच्या बैठकीत सांगितले की आपण मुख्यमंत्री ओमेन चँडी यांच्याकडे सविस्तर तक्रार केली असून आपण त्यांना मंगळवारी भेटणार आहोत. श्वेता यांच्या वतीने निवेदन व तक्रार माकपची युवक शाखा असलेल्या डीवायएफआयने नोंदवली आहे. विनयंभग नेमका कुणी केला हे श्वेताने सांगितले नसून तक्रारीत सगळा सविस्तर तपशील दिल्याचे तिने म्हटले आहे. जिल्हाधिकारी बी. मोहन यांनी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केला. जिल्हाधिकारी मोहन यांनी या आरोपावर सांगितले की, तिने तोंडी किंवा लेखी तक्रार दिलेली नाही. ते म्हणाले की, कोल्लमच्या पोलीस आयुक्तांना आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. कारण आमदार ऐशा पोट्टी यांनी एसएमएसवर श्वेताच्या वतीने तक्रार केली आहे. हे राजकीय हेतूने प्रेरित प्रकरण असल्याचा आरोप श्वेता मेनन हिने फेटाळला आहे. चित्रपट उद्योगात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. महिला संघटनांनीही खासदारांविरोधात कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
श्वेताने केलेला आरोप खोटा असून खासदार कुरूप म्हणाले, तिने जे सांगितले त्यावर ती ठाम आहे. टीव्ही फुटेजमध्ये खासदार प्रेसिडेंट ट्रॉफी बोट रेस कार्यक्रमाच्या वेळी तिच्या दिशने जातात व तिला स्पर्श करतात असे दाखवले आहे. मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी सांगितले की, आपल्याला श्वेता मेनन यांची तक्रार मिळालेली नाही व तक्रार मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.