देशभरात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे १,७३१ रुग्ण मृत्युमुखी पडले असून सुमारे ३० हजार लोकांना त्याची लागण झाली आहे. १५ मार्च रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची माहिती जाहीर केली. देशभरातील सर्व राज्यांमध्ये आतापर्यंत २९,९३८ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
१४ मार्चपर्यंत स्वाइन फ्लूने १,७१० जणांचे बळी घेतले, तर त्या दिवसापर्यंत २९,५५८ जणांना त्याची लागण झाली होती. सन २००९ मध्ये २७,२३६ जणांना या रोगाची लागण झाली होती, तर ९८१ जण त्यामुळे मरण पावले होते. २०१० मध्ये २० हजारांहून अधिक लोकांना स्वाइन फ्लूने ग्रासले, तर १,७६३ लोक मरण पावले होते.
या वर्षी गुजरातमध्ये स्वाइन फ्लूची तीव्रता सर्वाधिक असून तेथे आतापर्यंत ३८७ जण मरण पावले, तर ६,१४८ जणांना लागण झाली. गुजरातखालोखाल राजस्थानचा क्रमांक असून त्या राज्यात या रोगाने ३७८ जणांचा घास घेतला, तर ६,२०२ जणांना आपल्या विळख्यात ओढले. महाराष्ट्रातही स्वाइनची तीव्रता मोठी असून बळींची संख्या २९३ तर लागण झालेल्यांची संख्या १,९०९ आहे.
मध्य प्रदेशची परिस्थिती फारशी वेगळी नाही. तेथे आतापर्यंत २३९ लोक स्वाइनमुळे मरण पावले असून १,९०९ जणांना लागण झाली आहे. दिल्लीतही स्वाइन फ्लूने ११ जणांवर घाला घातला, तर ३,९०८ जणांना त्याची लागण झाली.
तेलंगणात ७२, पंजाबमध्ये ५१, कर्नाटकात ७१ तर हरयाणात ४५ जणांचा या रोगाने मृत्यू ओढवला आहे.
हिमाचल प्रदेश, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये अनुक्रमे १८, ११ न १३ जण मृत्युमुखी पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हीच संख्या १९ असून उत्तर प्रदेशातही ३५ जण मरण पावले आहेत. आंध्र प्रदेश व छत्तीसगढ राज्यातही अनुक्रमे २० व १६ रुग्णांचा स्वाइनने बळी घेतला.