देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असतानाच आता या आजाराचा विषाणू अधिकच भयानक झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एच१एन१ हा स्वाइन फ्लूचा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून त्यामुळे होणारा आजार अतिगंभीर व संसर्गजन्य झाल्याचा निष्कर्ष मॅसाच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेने (एमआयटी) काढला आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने देशभरात आतापर्यंत दीड हजार जणांचा बळी घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्वाइन फ्लूच्या देशभरातील बळींचा आकडा जाहीर केला. आतापर्यंत या आजाराने एक हजार ५८७ जणांचा बळी घेतला असून तब्बल २७ हजार ८८६ जणांना या आजाराची लागण झाली आहे. एच१एन१ विषाणूत बदल झाले असून तो अधिक घातक झाल्याचे एमआयटीने स्पष्ट केल्याने आणखी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.