अमेरिकास्थित खातेदारांना कर चुकविण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केल्याप्रकरणी ‘क्रेडिट स्युसी’ अर्थात स्विस बँकेस दोषी ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी आपली चूक असल्याचे मान्य करीत दोन अब्ज ६० कोटी डॉलरचा दंड भरण्याची तयारीही बँकेने दाखविली आहे.
कर चुकविता यावा यासाठी स्विस बँकेने अमेरिकेतील नागरिकांना साहाय्य केले. बँकेकडूनच कायद्याचे उल्लंघन करणारे वर्तन केले असेल तर सरकारच्या न्याय विभागाकडून अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल केला जातो आणि संपूर्ण ताकदीने दोषींना शिक्षा केली जाते, असे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी स्पष्ट केले.
गेल्या २० वर्षांमध्ये अशा स्वरूपाचा गुन्हा केल्यामुळे दोषी ठरलेली स्विस बँक ही सर्वात मोठी आणि नामांकित बँक आहे. त्यांनी आपल्या गैरकृत्यांची कबुली दिली आहे. अमेरिकेचा कर बुडविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या, त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या देशविदेशातील सर्व व्यक्ती, संस्था आणि कंपन्या यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.