भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ३० सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची २०१८ पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तो गेल्या वर्षीपासून अंमलात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत लेखी उत्तर आले. भारताचा विचार करता काही माहिती पाठविणे आवश्यक आहे, असे स्विस फेडरल कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा ७३ देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची ३६ देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे. बँकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बँकिंग माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

होणार काय?

किमान शेकडो बँक खात्यांबाबतची माहिती भारताला मिळण्याची शक्यता आहे. या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी वृद्धिंगत होतील, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ही माहिती स्वीकारण्याची आम्ही तयारी केली आहे असे दिल्लीतील ‘फॉरेन टॅक्सेशन अ‍ॅण्ड टॅक्स रीसर्च’च्या (एफटी अ‍ॅण्ड टीआर) अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.