अणुसाहित्य पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी स्वित्र्झलडने पाठिंबा दिला आहे. या गटाची बैठक होण्याआधी स्वित्र्झलडने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात हा पाठिंबा जाहीर केल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय, करचुकवेगिरी व काळा पैसा शोधण्याबाबत सहकार्य करण्यात येईल, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे.

अणुसाहित्य पुरवठादार गटात भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी आमचा पाठिंबा आहे असे स्वित्र्झलडचे अध्यक्ष जोहान स्नायडर-अम्मान यांनी सांगितले. भारताने या सदस्यत्वासाठी १२ मे रोजी अर्ज केला आहे. त्यावर व्हिएन्नामध्ये ९ जून व सोल येथे २४ जून रोजी बैठकांत चर्चा होणार आहे. एकूण ४८ सदस्य देश या गटात आहेत. एनएसजी गटासाठी पाठिंबा दिल्याने मी स्वित्र्झलडच्या अध्यक्षांचा आभारी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. काही भारतीय लोकांचा काळा पैसा स्विस बँकांत असून त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. तसेच, व्यापार, गुंतवणूक व व्यावसायिक प्रशिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्याचेही दोन्ही देशांनी मान्य केले.