फुटीरतावादी हुरियतचा नेता सय्यद अली शहा गिलानी याच्या सभेत पाकिस्तानी ध्वज फडकावण्यात आल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी आज दिले.
अमरनाथ यात्रेचा काळ ५९ दिवसांऐवजी ३० दिवस करण्यात यावा ही मागणी सईद यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, अमरनाथ यात्रा ठरल्याप्रमाणे होईल.
अहमदाबाद येथे पत्रकारांनी त्यांना कालच्या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, काही लोक त्यात सहभागी होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पाकिस्तानचे ध्वज फडकावणाऱ्या मसारत आलम याला आधीच गजाआड करण्यात आले आहे. त्याला सोडले तेव्हा लोकसुरक्षा कायद्याखाली तो पाच वर्षे तुरुंगवास भोगून आला होता, आपण त्याला पाकिस्तानी ध्वज फडकावताना पाहिले व लगेच त्याच्यावर कारवाई केली.
शुक्रवारी गिलानी याची पुन्हा काश्मीरमधील त्राल येथे सभा झाली त्यात त्यांनी अमरनाथ यात्रा तीस दिवसांची करण्याची मागणी केली व पर्यावरण रक्षणाचे कारण सांगितले. त्याच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देत पाकचे ध्वज फडकावले. काश्मिरी पंडितांनी १९९० मध्ये काश्मीर सोडले, पण त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही प्रयत्न केले. एकूण तीन लाख काश्मिरी पंडित तेव्हा निर्वासित झाले होते. आपले सरकारही त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करील.
काश्मिरी पंडितांच्या स्वतंत्र वसाहती केल्यास ते संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे उल्लंघन होईल या पाकिस्तानच्या भूमिकेवर सईद यांनी उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गिलानी याच्या सभेत पाकिस्तानी ध्वज फडकावण्यात आल्याचा निषेध केला व सरकारकडून कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले. दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी जम्मूत गिलानी यांच्या अटकेसाठी निदर्शने केली.