दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा मिळावी तसेच मृत्युशी झुंज देत असलेल्या पीडितेची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी भावना आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी आपले सरकार प्रतिबद्ध असल्याची पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ग्वाही दिली.
या निर्घृण घटनेतील आरोपींना न्यायालयात उभे करण्यात वेळ दवडला जाऊ नये, अशी भावना सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या १२७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर बोलताना व्यक्त केली. या प्रकरणी सोनियांनी प्रथमच जाहीर वक्तव्य केले. या घटनेवरून उसळलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशीही सोनिया गांधी यांनी मध्यरात्री संवाद साधला होता. पण आज त्यांनी प्रथमच प्रसिद्धी माध्यमांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘आजचा दिवस नववर्षांच्या जवळचा असल्यामुळे आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो. पण आज आमचे विचार मृत्युशी झुंज देत असलेल्या तरुणीमध्ये गुंतले आहेत. ती बरी होईल आणि आमच्यात परत येईल, एवढीच आज आमची इच्छा आहे,’ असे सोनिया गांधी काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. या घृणास्पद गुन्ह्याविषयी देशभरात उसळलेल्या संतापाशी आम्हीही सहमत आहे. पीडित मुलीवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जात आहेत आणि ती बरी व्हावी, अशीच आमची प्रार्थना आहे, असे मनमोहन सिंग म्हणाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित बराचवेळ चर्चा करताना दिसले. दीक्षित यांनी शिंदे यांच्याकडे दिल्ली पोलिसांविषयी लेखी तक्रारी केल्या आहेत.
सामूहिक बलात्कार प्रकरणी वृत्तवाहिन्या पोलीस, वकील आणि न्यायाधीशाची भूमिका बजावत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली. बलात्काराच्या घटनेनंतरचे आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या एका पोलीस शिपायाच्या मृत्युवरून सिंह यांनी वृत्तवाहिन्यांना धारेवर धरले आणि सामंजस्य आणि जबाबदारीने काम करणाऱ्या वृत्तपत्रांची प्रशंसा केली.