सीरियातील यादवी युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू होण्याआधीच त्यात अडथळे आले आहेत. प्रमुख विरोधी गटाने या चर्चेत सहभागी होणार नाही अशी धमकी आधीच दिली आहे. दरम्यान सीरियातील शिया धर्मस्थळाजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटात आज १२ जण ठार झाले आहेत.
जीनिव्हा येथे विरोधी गटांचे प्रतिनिधी चर्चेसाठी दाखल झाले असून त्यांनी बशर अल असाद सरकारशी चर्चा करण्याची आमची तयारी नाही असे सांगितले. वाटाघाटी समिती संयुक्त राष्ट्रांचे दूत स्टीफन द मित्सुरा यांना आज भेटणार असून काही शहरांमध्ये मानवी मदत सुरू करणे व बॉम्बहल्ले थांबवण्याची मागणी करणार आहे. जर सरकारने हे गुन्हे चालूच ठेवले तर जीनिव्हात सरकारचे प्रतिनिधीत्व काही उपयोगाचे ठरणार नाही, असे समन्वयक रियाद हिजाब यांनी सांगितले. सीरियातील मानवी परिस्थिती चिंताजनक असून डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संघटनेने म्हटल्यानुसार मदाया येथे आणखी सोळाजणांचा उपासमारीने मृत्यू झाला. बंडखोरांनी किंवा सरकारी दलांनी तिथे रस्ते रोखून धरले आहेत.
सीरियात ४५ लाख लोक अत्यंत दयनीय परिस्थिीतीत दिवस काढत आहेत, असे रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने म्हटले आहे. तेथील लोक गवत व पानांचे सूप करून त्यावर दिवस काढत आहेत. यादवी युद्धात २ लाख ६० हजार लोक २०११ पासून ठार झाले आहेत. तुर्कस्थान व रशिया या दोन देशात भांडणे चालूच असून तुर्कस्थानने रशियावर हवाई हद्द ओलांडल्याचा आरोप केला आहे. जगातील अनेक हल्ल्यांसाठी सीरियातून मदत मिळत आहे. त्या देशातील निम्मे लोक घरदार सोडून शेजारी देशात पळाले आहेत. युरोपमध्ये निर्वासितांचा लोंढा वाढत असून २०१५ मध्ये ४ हजार लोक युरोपात जाताना बुडून मरण पावले आहेत.