पेट्रोल-डीझेलच्या किंमती येत्या काही दिवसांत गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सीरियामधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किंमती अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत खनिज तेलांच्या किंमती ८० डॉलर प्रतिबॅरल होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या दरांना बसेल व त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किंमती ९० ते १०० रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज जगातील मोठ्या रिसर्च कंपन्यांपैकी एक जेपी मॉर्गनने वर्तवला आहे. यापूर्वीच कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. जर पेट्रोलच्या किंमती ९० किंवा १०० रुपयांना पोहोचल्या तर सामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महागाई वाढण्याची शक्यता –
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास रुपया कमकुवत होईल. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी सरकारला जास्त पैसे मोजावे लागतील, त्याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर होईल. परिणामी सामान्य व्यक्तीला महागाईचा फटका बसू शकतो.

काय आहे कारण-
सीरियाचे अध्यक्ष बशार अल असाद यांनी डौमा येथे गेल्या आठवडय़ात केलेल्या रासायनिक हल्ल्यात निरपराध लोकांनी जीव गमावल्यानंतर, या विरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या मित्र राष्ट्रांनी शनिवारी पहाटे (भारतीय वेळेनुसार) सीरियावर हल्ला केला. राजधानी दमास्कस तसेच, सीरियाच्या अन्य भागांत शंभराहून अधिक क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यातील बरीचशी क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. मित्र राष्ट्रांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘रासायनिक हल्ले करणारा सीरिया हा गुन्हेगारीचा राक्षस आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सूतोवाच केले होते. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये निराशेचे वातावरण होते, त्यामुळे बाजारात घसरणही झाली होती.

पश्चिम आशियातील संभाव्य अस्थिरतेचा विपरीत परिणाम कच्च्या तेलांच्या किमतीवरही झाला. कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला. वायदा बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर ७२ डॉलरवर पोहोचले होते. सीरियावरील कारवाईमुळे पश्चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syrian crisis petrol price india can reach 90 rs per liter
First published on: 17-04-2018 at 12:04 IST