नव्याने निवडून आल्यानंतर दोन महिन्यांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनी गुरुवारी आपले नवे सरकार स्थापन केले. या वेळी असाद यांनी महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये कोणताही बदल केला नाही. सततच्या युद्धामुळे सीरियातील राजकीय, आर्थिक तसेच सामाजिक घडी पूर्णत: विस्कटलेली आहे.
असाद यांच्या नव्या मंत्रिमंडळात ११ मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र पंतप्रधान वायेल अल हलाकी, परराष्ट्रमंत्री वालिद मौलेम आणि संरक्षणमंत्री जनरल फहाद अल फरेजी यांच्याकडील पदभार कायम ठेवला आहे. नव्या रचनेनुसार गृहमंत्री, न्यायमंत्री आणि धार्मिक व्यवहार मंत्री तसेच माहिती अध्यक्षीय व्यवहार मंत्र्यांच्या कार्यभारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हसन अल नुरी हा असाद यांच्या मंत्रिमंडळातील नवा चेहरा असेल. नुरी यांच्याकडे प्रशासकीय विकासमंत्री पद देण्यात येणार आहे. ३ जून रोजी झालेल्या निवडणुकीत नुरी हे असाद यांच्याविरोधात उभे होते. परंतु त्यांना यात यश आलेले नव्हते. सीरियाची पहिली बहुउमेदवार अध्यक्षीय निवडणूक असाद यांनी जिंकली होती. असाद यांना ८८. ७ टक्के मते मिळाली होती. असाद यांनी देशातील आर्थिक सुधारणांवर भर देण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी अर्थ, वाणिज्य, जलस्रोत, गृहनिर्माण, दळणवळण आणि आरोग्य आदी मंत्रालयात बदल केले आहेत. तीन वर्षांच्या युद्धाच्या काळात देशाचा आर्थिक कणा मोडून पडला असताना रक्तपातात १ लाख ९० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार चार सीरियन नागरिकांमधील तिघे हे गरीब आहेत. देशातील निम्म्याहून अधिक लोक अत्यंत गरीब आहेत. युद्धांमुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.