करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताचं खूप मोठं नुकसान केलं असून अद्यापही तिला रोखण्यात यश आलेलं नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव गमावले असून अनेक राज्यांमधील संसर्गाचं प्रमाण हे चिंता वाढवणारं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात परिस्थिती गंभीर होत चालली असून कानपूरसारख्या शहरांना मोठा फटका बसला आहे. मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर्स यासाठी संघर्ष करणाऱ्या रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. मृतदेह मिळण्यासाठीही लोकांना कित्येक तास वाट पहावी लागत आहे.

फक्त सर्वसामान्यच नाही तर देशसेवा करणारेही या परिस्थितीत हतबल झाले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर (निवृत्त) हरी राम दुबे यांना करोनामुळे आपला मुलगा गमवावा लागला आहे. आपल्या ३१ वर्षीय मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी कित्येक तास वाट पहावी लागली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “धन्य ते योगीजी आणि धन्य ते मोदीजी”; भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया

निवृत्त झालेल्या हरी राम दुबे यांनी कानपूरमधील हॉलेट रुग्णालयात बोलताना सांगितलं की, “मी १९८१ ते २०११ पर्यंत आपल्या मातृभूमीची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावलं. मी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केलं आणि कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही. मंगळवारी संध्याकाळी त्याचं करोनाने निधन झालं”.

आणखी वाचा- मोदी सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल’ला करोनाचा फटका; भारत मदतीसाठी मित्रराष्ट्रांवर निर्भर

मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी हरी राम दुबे यांना आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. नंतर अखेर कुटुंबाला पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात आली. “मी केलेल्या कामाबद्दल लष्कर प्रमुखांकडून प्रमाणपत्र देऊन माझा गौरव करण्यात आला होता. मी कारगिल युद्धात सहभागी होतो. मी दहशतवाद्यांशी लढलो, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही आणि आता कागदपत्रांसाठी पळवत आहेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे आणि ही वागणूक म्हणजे छळ आहे,” असं हरी राम दुबे यांनी सांगितलं आहे.