दिल्लीतील निझामुद्दीन भागात मार्च महिन्यांत तबलिगी जमातने धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते, त्यामुळे तो अनेकांमध्ये करोनाचा विषाणूच्या फैलावाचं कारण ठरला, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितल.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी राज्यसभेत लिखित उत्तर देताना म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी २३३ तबलिगी जमातच्या सदस्यांना अटक केली आणि २९ मार्चपर्यंत २,३६१ लोकांना संघटनेच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आलं. तर तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना मोहम्मद साद याची सध्या चौकशी सुरु आहे.”

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, “कोविड -१९ च्या उद्रेकाच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांनी मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केलेले असतानाही दीर्घ कालावधीसाठी फिजिकल डिस्टंसिंग न पाळता मास्क आणि सॅनिटायझरची तरतुद न करता बंद जागेत एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच हा मेळावा अनेकांमध्ये करोना विषाणूच्या फैलावाला कारणीभूत ठरला.”