‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ सिनेमात उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या एका मुलाखतीवरून वादंग निर्माण झालं आहे. “भारतात ब्रिटिश आले तेव्हा भारत ही संकल्पना अस्तित्वात नव्हती,” असं सैफ म्हणाला होता. त्यावरून वाद सुरू झाला असून, भाजपाने तैमूरच्या नावाचा सदंर्भ देत सैफ अली खानला उत्तर दिलं आहे.

भाजपाच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी अभिनेता सैफ अली खानने तानाजी सिनेमा बद्दल आणि भारतीय इतिहासावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सैफने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावरही प्रश्न उपस्थित केला आहे. “काही कारणांमुळे मी याआधी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. कदाचित पुढच्या वेळी मांडेन. पण मला दिलेली भूमिका खूप चांगली असल्याने ती साकारण्यासाठी मी उत्साही होतो. पण जेव्हा लोक म्हणतात की हाच इतिहास आहे, तर मी त्यांच्याशी सहमत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहित आहे. इंग्रज येण्याआधी भारत ही संकल्पना नव्हती,” असे सैफने मुलाखतीत म्हटले होते.

त्याने मुलाखतीत व्यक्त केलेल्या मतांवर भाजपाने टीका केली आहे. “अगदी तुर्कांना देखील तैमूर आवडत नव्हता. मात्र तरीही काही लोक आपल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी तैमुरचे नाव निवडतात,” असं म्हणत भाजपाच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सैफवर टीका केली आहे.
लेखी यांनी ट्रू आयडोलॉजी या ट्विटर पेजच्या एका ट्विटचा दाखला देत हे ट्विट केले आहे. तैमूरच्या दरबारातील कवी शरीफ अद-दीन अल्दी याजदा यांचे हे चित्र आहे. चित्रात तैमूरच्या मागे सापळ्यांचे एक विशाल पिरॅमिड आहे. त्यावर तैमुर हसत आहे. इतिहास माहित नसताना देखील सैफने आपल्या मुलाचे नाव तैमूर असे ठेवले, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा – भारताबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सैफ अली खानवर संतापले नेटकरी

अलीकडेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरही मीनाक्षी लेखी यांनी ट्विट करून टीका केली होती.